महिला पोलिसांसाठी विश्रामगृहाची निर्मिती

0

बोदवड । पोलिस दल आधुनिकीकरण कार्यक्रम 2014-15अंतर्गत महिला पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांसाठी बोदवड पोलिस ठाणे आवारात विश्रामगृहाचे बांधकामास गती मिळाली आहे. या कामासाठी एकूण 15 लाखांचा निधी खर्च होणार असून, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

बांधकाम विभागातर्फे कामाला सुरुवात
तालुक्यात होणार्‍या जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी निवडणूक कालावधी, सणवार आणि अन्य प्रसंगी जिल्हास्तरावरून बंदोबस्तासाठी येणार्‍या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह नसल्यामुळे अडचणी येत होत्या. ही समस्या सोडवण्यासाठी पोलिसदल आधुनिकीकरण कार्यक्रमातून पोलिस ठाण्याच्या आवारात विश्रामगृहाचे बांधकाम केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महिनाभरापूर्वी या कामाला सुरुवात झाली असून, लवकरात लवकर काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, प्रसाधनगृह, स्नानगृह आणि चेंजरूमचे बांधकाम होणार आहे, तर पुरुष अधिकार्‍यांसाठी विश्रामगृह, चेंजरूम आणि प्रसाधनगृहाची उभारणी होणार आहे. महिनाभरापूर्वीच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. आगामी काही महिन्यांच्या काळात विश्रामगृहाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.