महिला नेत्यांना धमकी देणारा गजाआड

0

मुंबई – शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्ता निलम गोर्‍हे आणि विधानपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांना धमकी दिल्याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. दिपककुमार प्यारेलाल गुप्ता असे या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे.

मूळचा जळगावचा रहिवाशी असलेल्या दिपककुमारने विद्या चव्हाण यांना अश्लील मॅसेज पाठविल्याची तसेच धमकी दिल्याची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे त्याने शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्ता निलम गोर्‍हे यांनाही धमकी दिली आहे. विद्या चव्हाण या विलेपार्ले परिसरात राहत असून त्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी आपल्याला एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरुन अश्लील मॅसेज आणि धमकी येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या घटनेची विलेपार्ले पोलिसांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध 507, 509 भादवी सहकलम 67 (ए) कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्याकडे होता. हा तपास हाती येताच विलेपार्ले पोलिसांच्या एका विशेष पथकाने आज सायंकाळी जळगाव येथून दिपककुमार गुप्ता याला अटक केली. पोलीस तपासात तो आरटीआय कार्यकर्ता असून सघ्या जळगावच्या घारकुल, शिवाजीनगर, फ्लॅट क्रमांक 388 मध्ये राहतो. त्याच्या चौकशीत त्याने विद्या चव्हाण यांना धमकी तसेच अश्लील मॅसेज केल्याची कबुली दिली आहे.

विद्या चव्हाण यांच्याप्रमाणे शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनाही अशाच प्रकारे धमकी येत होत्या. या धमकीची त्यांनी मुंबई आणि पुण्याच्या पोलिसांकडे तक्रार केली . या धमकीमागे दिपककुमारचा सहभाग आहे का याचाही पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान दिपककुमार जळगाव येथून मुंबईत आणले असून त्यांने आणखी कोणाला धमकावले आहे का त्याची चौकशी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले.