Private Advt

महिला अधिकार्‍याची बॅग लांबवली : चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : महिला आयएएस अधिकार्‍याची पावणेदोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग लांबवणार्‍या चोरट्याच्या खंडव्यातून लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 12 तासात मुसक्या आवळल्या आहेत. बरोनी अमदाबाद एक्स्प्रेस या गाडीच्या बी-3 या डब्यातील सीट 71 वरून आयएएस अधिकारी प्रीती राज या प्रवास करीत असताना त्यांची बॅग शनिवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास चोरीला गेली होती. राज यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने तपासचक्रे गतिमान केल्यानंतर चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राहुल सुभाजी रोकडे (27, गायत्री मंदिर, सुरजकुंड, खंडवा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

प्रशिक्षणार्थी महिला आयएएस अधिकार्‍याची बॅग लांबवली
प्रशिक्षणार्थी महिला आयएएस अधिकारी कृती राज (30, रा.लालबहाद्दुर शास्त्री अ‍ॅकेडमीम, मसुरी, डेहराडून, उत्तराखंड) या ट्रेन क्रमांक 19484 मधील बोगी क्रमांक बी- 3 मधून 7 रोजी प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांची लॅपटॉपसह एक लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली बॅग लांबवली होती. याबाबत सुरत लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र घटनास्थळी हे भुसावळ असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
औरंगाबाद पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील व आरपीएफ आयुक्त क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय घेरडे व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ भुसावळ जंक्शन स्थानकावर लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या फुटेजची पाहणी केल्यानंतर बरोनी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून एक संशयीत चोरी गेलेल्या बॅगेच्या वर्णनाप्रमाणे उतरल्याचे दिसले शिवाय हा संशयीत प्रवास स्थानकावर बाहेर आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या दिशेने चक्र फिरवले. संशयीताने बसस्थानकावर एका कुलीशी संवाद साधत असताना सिगारेट पिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या माध्यमातून आरोपीचा माग काढून त्याच्या खंडव्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून लॅपटॉपसह एक लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा  गुन्हा भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, सागर खंडारे, खंडव्याचे पुष्कर धाकड, आरपीएफचे एएसआय प्रेम चौधरी, वसंत महाजन यांनी उघडकीस आणला. तपास उपनिरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत. दरम्यान, तपास पथकाला औरंगाबाद अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 15 हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले तसेच प्रमाणपत्र देवून गौरवही केला.