महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली : देशात बलात्कार, अत्याचार यासारख्या भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल दिवस-रात्र माहिती देण्याची सेवा उपलब्ध व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात याकरिता महिलांसाठी 24 तास काम करणार राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांना तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते महिलासांठी 24 तास 7 दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या महिलांना लगेचच मदत मिळणं सोपं होणार आहे.

18 वर्षांची किंवा त्याहून जास्त वयाची तरुणी किंवा महिला या हेल्पलाईनला फोन करून सेवा घेऊ शकते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या www.ncw.nic.in या वेबसाईटच्या माध्यातूनही महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. लिखित स्वरूपात आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांची माहिती महिला देऊ शकतात. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन आयोग त्यावर तातडीने कारवाई करतो आणि समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. तक्रार नोंदवण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवण्यासाठी आयोगाने ही हेल्पलाईन सुरू केली आहे.

महिलांना गरज असल्यास हेल्पलाईनमधील तज्ज्ञ सल्लाही देणार आहेत. ही हेल्पलाईन पोलीस, हॉस्पिटल्स, जिल्हा सेवा प्राधिकरण, मानसशास्रज्ञ यांच्याशी जोडण्यात येणार आहे. तसेच याच हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना सरकारी योजनांची माहितीही दिली जाणार आहे. महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश आहे. देशातील कोणतीही महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल हेल्पलाईन क्रमांक 7827 170 170 वर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकते. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना वेळेवर माहिती आणि मदत पुरवली जाईल, असं राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Copy