महिलांकडे पाहण्याची विकृत मानसिकता ही समाजाला लागलेली कीड – विजया रहाटकर

0

‘महिला हक्क व कायदे’ यावर परिसंवाद

पुणे : महिलांकडे पाहण्याची विकृत मानसिकता ही समाजाला लागलेली कीड आहे. रूप, रंग, देहापलीकडे तो सन्मानाने कधी बघेल याची प्रत्येक स्त्री वाट बघत आहे. समाजातील सर्व पुरुष वाईट नाही. परंतु अशा विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाजरचनेला धक्का पोहोचत आहे. याविरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग व आम्ही पुणेकर यांच्या वतीने ‘महिला हक्क व कायदे’ यावर परिसंवाद नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होेता. यावेळी अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, यशदाच्या उपसंचालक प्रेरणा देशभ्रतार, उद्योजिका नयना चोपडे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, पं. वसंतराव गाडगीळ, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, प्रणव पवार, अरविंद जडे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई, मदन गोकुळे उपस्थित होते. कार्यक्रमात रहाटकर यांचा पुणेरी पगडी व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

अन्यायाविरुद्ध सध्या महिला आवाज उठवत आहेत

रहाटकर म्हणाल्या, आज अनेक क्षेत्रात महिला आपल्या मेहनतीने उच्च पदावर काम करताना दिसतात. पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करत आहेत. सरकारने देखील अनेक योजनांद्वारे महिलांमध्ये सकारात्मक बदल घडविले आहेत. अशाप्रकारचे आशेचे चित्र दिसत असतानाच काही ठिकाणी मात्र महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे प्रसंग घडत आहेत. अन्यायाविरुद्ध सध्या महिला आवाज उठवताना दिसत आहेत. त्या अत्याचार सहन न करता धीट होत आहेत.

कोणतीही गोष्ट साध्य

नयना चोपडे म्हणाल्या, महिलांनी ठरविले तर त्या कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात. आपल्या समोर कोणताही प्रसंग आला तरी त्याला खंबीरपणे सामोरे जा.

हेमंत जाधव म्हणाले, महिलांना आपल्या हक्काविषयी तसेच कायद्याविषयी माहिती मिळावी यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

Copy