महाव्यवस्थापकांसह 33 जणांवर गुन्हा दाखल

0

नंदूरबार : स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अनुदानासाठी बनावट प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी नंदूरबार जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकासह 5 अधिकारी व 28 उद्योजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आली. माहितीनुसार जिल्हा उद्योग केंद्राचे नंदूरबारचे महाव्यवस्थापक सुरूपसिंग वसावे यांनी 2001 साली सामूूहीक प्रोत्साहन योजना राबवितांना लाभधारक घटकांना वगळून तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांशी संगनमत करून बेकायदेशीर पद्धतीने प्रस्ताव सादर करून खोटी व बनावट प्रमाणपत्रे सादर करून अनुदान प्राप्त केले. यामुळे कायदेशीर बाबीचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय अधिकाराचा गैरवापर करून सुमारे 6 कोटी 3 लाख 14 हजार 862 रूपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप महाव्यवस्थापक वसावे यांच्यासह दामू पाडवी, विजयकुमार निरकड, जगदीश श्रीवास व ओंकार चव्हाण या अधिकार्‍यांसह 28 उद्योजकांवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक प्रोत्साहन योजना राबवितांना 6 कोटींचा भ्रष्टाचार करून अनुदान लाटण्याच्या प्रकरणात 5 अधिकार्‍यांसह शहाद्याचे अमिन मेमन, वली मोहंमद मेमन, साहील रफीक हासमाणी, नईम बागवान, नियाज अन्सारी, परवीन मेमन, शिरीन इसाणी, मिनाज मेमन, आसमा हासमाणी, अब्दुल मेमन, शबाना हासमाणी, रफिक हासमाणी, आरीफ हासमाणी, रूकसाना इसाणी, यास्मीन इसाणी तसेच नवापूरचे कल्याण राजपूरोहीत, रियाज लाखाणी, फैजल लाखाणी, पंकजकुमार सोमाणी, विनिता जैन, शितल चीतलाणी, दिलीपकुमार शहा, कमलेश जैन, प्रकाशचंद्र जैन, जितेंद्रभाई घालीवाला, भारतकुमार घालीवाला, विश्‍वनाथ सूर्यवंशी, राजेंद्र चौधरी यांच्यावर गुन्ह्यात मदत करून प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामूहिक प्रोत्साहन योजनेत 6 कोटी रूपयांच्या अनुदानाची हेराफेर झाली आहे. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन सुविधा व मालमत्तेचा गैरवापर करून शासनाचे नुकसान व्हावे व उद्योजकांचा फायदा व्हावा म्हणून नियम व अटींचा भंग केला आहे. म्हणून या प्रकरणात नंदूरबार शहर पोलिस स्टेशनला विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक के.बी.खेडकर व लाचलुचपत विभाग नंदूरबारने केली.