महाविद्यालयीन तरूणाचा अपघात नव्हे घातपात

0

नंदुरबार । महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाला आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिपक पाटील या तरूणाच्या नातेवाईकांनी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत घेवून केली आहे. शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथील महाविद्यालयीन तरूण दिपक पाटील हा 1 सप्टेंबर 2016 रोजी मित्र भुपेश देवरे व अ‍ॅपेरिक्षा चालक भूषण ताराचंद पाटील यांच्यासोबत शहादा येथे गेला होता. दरम्यान परत येत असतांना अनरदबारीजवळ अ‍ॅपेरिक्षा उलटून झालेल्या अपघातात दिपक याचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे मात्र घटनेतील विसंगत पाहता दिपक याचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाल्याचा संशय मयत दिपकची आई आशाबाई राजेंद्र पाटील, वडिल राजेंद्र दगा पाटील यांनी केला आहे.

तपास योग्य करीत नसल्याची तक्रार
दिपकच्या मित्र भूषण देवरे याने पोलिसात दिलेली फिर्याद आणि पुरवणी जबाबात विसंगत आढळून आली आहे. पोलिसांनी देखील राजकीय दबावात येवून तपासात संशयाची भूमिका निभावली आहे, असे मयत दिपकच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. याबाबत मयताच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पोलिसांच्या भूमिकेबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास योग्य करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. राजकीय दबावाखाली न येता पोलिसांनी सखोल तपास करावा, अन्यथा हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी मयत दिपकच्या नातेवाईकांनी केली आहे.