महावितरण कंपनीत रिक्त जागा ताबडतोब भरा!

1

धुळे । राज्य शासनाच्या अधिकाराखालील तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा ताबडतोब भरण्यात याव्यात, अशी मागणी सर्कल सचिव नाना पाटील यांनी केली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद निवृत्त झालेल्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता एन.आर.कोतवाल, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, दोंडाईचा येथील उपकार्यकारी अभियंता श्री.जगताप, सहा.अभियंता पाटील उपस्थित होते.

रिक्त जागा न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
यावेळी नाना पाटील म्हणाले की, रिक्त जागांच्या अनुषेशामुळे सर्व सामान्य वीज ग्राहकांना योग्य वेळी वीजपुरवठा करतांना अडचणी निर्माण होतात. एका जनमित्राकडे 4 ते 5 खेडे असतात. त्यामुळे तक्रारी वेळेत सोडविण्यात अडचणी येतात. सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर जागेवर कोणत्याही कामगाराची नेमणूक होत नाही. ज्या परिस्थितीत स्टाफ आहे, त्यांनाच कामाची विभागणी केली जाते. म्हणून अपघात होण्याचा संभव असतो. वर्कर्स फेडरेशनतर्फे प्रशासनाला नेहमी पत्रव्यवहार केला जातो. त्या कामासाठी संघटना संप, आंदोलने करीत असते. परंतु, सध्याच्या प्रशासनाने याची दखल न घेता, आहे त्याच कामगारांकडून काम करुन घेणेे असा एकमेव कृती कार्यक्रम चालू आहे. भविष्यात प्रशासनाने रिक्त जागा न भरल्यास वर्कर्स फेडरेशनतर्फे राज्यभरात उग्र आंदोलन केले जाईल, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी सेवानिवृत्त कामगार नंदुरबारचे गुलाब चौधरी, दोंडाईच्याचे सुधाकर तावडे, शिंदखेड्याचे के.जी.बडगुजर आदींना निरोप देण्यात आला. सूत्रसंचालन संजय खैरनार यांनी केले. कार्यक्रमासाठी कॉ.विशाल पाटील, राजू मराठे, अनिल माळी, कैलास तिरमले, डिपी.ठाकूर, चंदने यांनी प्रयत्न केले.