महावितरणमध्ये येत्या आठ दिवसात होणार ७ हजार जागांची भरती

0

मुंबई:- महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या आठ दिवसांत भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे वर्षभर रखडलेली ही भरतीप्रक्रिया आता पूर्ण होणार आहे.

निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, “महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून २ हजार उपकेंद्र सहायक आणि ५ हजार विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

ऊर्जामंत्र्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी राऊत यांचे आभार मानले आहेत. तसेच तांबे म्हणाले, “सध्या कोरोनाच्या संकटामुळे अर्थ विभागाने नवीन नोकर भरतीची प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले आणि त्यामुळे युवकांमध्ये एक घबराट पसरली होती. मात्र, या ही परीस्थितीत ज्याठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी भरती करीत राहिल्यास बेरोजगार युवकांना थोडा तरी आधार मिळत राहील.” तांबे यांच्याबरोबर अनेकांनी राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना त्यांचे आभार मानले आहेत.

Copy