महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमुळे नव उद्योजक घडतील – राज्यपाल

0
मुंबई : उद्योग  व्यवसायाबाबत नवसंकल्पना असणाऱ्यांना आणि स्टार्टअप विकसित करण्याची इच्छा असणाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमुळे मोठे व्यासपीठ मिळणार आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेमुळे राज्यात नव उद्योजक घडण्यास मदत होईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. राजभवन येथे महिनाभर चालणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची सुरुवात बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विभागाचे सचिव असिम गुप्ता आदी उपस्थित होते.
राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले, उद्योजक कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि उद्योजकांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी देशभरात स्टार्टअप इंडिया उपक्रमाअंतर्गत स्टार्टअप योजना सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळे प्रयोग होत असतात पण बाजारामध्ये त्या प्रयोगाचा वापर झाला तरच ती नवकल्पना यशस्वी होते. आगामी मानवी आयुष्यमान सुधारण्यासाठी मानवी संसाधनाचा अधिकाधिक वापर आणि स्टार्टअप महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांना स्टार्टअप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा लाभ मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’या उपक्रमाचा फायदा होणार आहे. कृषी, पाणी व्यवस्थापन यामध्ये स्टार्टअप होणे आवश्यक आहे. राज्यातील २० विद्यापीठ आणि यामध्ये शिकणारे ३० लाख विद्यार्थी यांनी स्टार्टअप मध्ये भाग घेऊन आपल्या कल्पना मांडाव्यात. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तीसाठी आणि स्टार्टअप साठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्टअप व्हॅन राज्यभरात फिरणार आहे याचा आनंद आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, स्टार्टअप यात्रेच्या निमित्ताने  महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक  गुंतवणूक झाली आहे. उद्योग आणि रोजगार क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. नॅस्कॉम यांनी दिलेल्या सर्वेक्षणानुसार, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स मध्ये २० कोटी रोजगार संपणार असले तरी २५ कोटी नवीन रोजगार निर्माण होणार आहे. यामध्ये ७० टक्के रोजगार नव्याने निर्माण होतील. आज भारताकडे युवाशक्तीची ताकद आहे, कारण ५० टक्केपेक्षा कमी लोकसंख्या २५ पेक्षा कमी वयाची आहे. या तरुणाईकडे असलेली प्रचंड उच्चशक्ती, नवकल्पना  आणि तंत्रज्ञानाची आवड यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात अविष्कार होणार आहे. कृषी क्षेत्रातील स्टार्टअप उत्कृष्ट असून येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात नवकल्पना समोर येणे आवश्यक आहे. उद्योग आणि रोजगार क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. या कार्यक्रमात भारतीय स्टार्टअप विश्वातील नामांकित स्टार्टअप उद्योजक देखील सहभागी होणार असून, सहभागी नव उद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल तसेच विविध कार्यशाळांच्या माध्यमातून स्टार्टअप संदर्भातील विविध विषयांमध्ये मार्गदर्शन मिळणार असल्याचा आनंद आहे.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, तरुणांना भविष्याचा रस्ता दाखवण्यासाठी स्टार्टअप महत्वाचे ठरेल. भविष्य घडविण्यासाठी स्टार्टअप हे एक माध्यम आहे. स्टार्टअपसाठी आवश्यक त्या सुविधांनी उपयुक्त अशी स्टार्टअप व्हॅन राज्यभरात फिरणार असून महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे ग्रॅंड फिनाले नागपूर येथे होणार आहे. मुळातच स्टार्टअप इकोसिस्टीम रुजवणे हे या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे ध्येय आहे स्टार्टअप या विषयातील मार्गदर्शन, रिसोर्सेस, इन्क्युबेटर,असलरेटर यासारखे स्टार्टअपशी संबंधित विविध कार्यक्रम,फंडिंग मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस, आणि स्टार्टअप इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सनां मिळणारे फायदे महाराष्ट्रातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचिवण्याचे लक्ष्य आहे.
राज्यातील १६ जिल्हे २३ थांबे आणि १४ बूट कॅम्प होणार असून ३ नोव्हेंबरला नागपूरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. नवकल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींना तथा उद्योजकांना स्टार्टअप इंडिया अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा सादरीकरण करण्यासाठी www.startupindia.gov.inकिंवा  www.msins.in वर याबाबत नोंदणी करता येणार आहे. या कार्यक्रमामध्ये १६ विद्यापीठांना इरादा पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.