महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय ऐतिहासिक

0

यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची भावना

यावल- मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय हा मराठा समाजासाठी ऐतिहासिकच आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्वपक्षीय विधीमंडळ सदस्यांचे आम्ही समाजाच्या वतीने आभार मानतो, अशी भावना माजी नगराध्यक्ष यावल तालुका मराठा संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्य शासनाने दिलेले मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकावे म्हणून तत्काळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविणे आवश्यक आहे आणि ते काम भाजपा सरकार करेल, असा विश्वास आहे. आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा करीत असताना मात्र ज्या 42 मराठा आंदोलकांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची जाणीव ठेवून शासनाने ठोस मदत केली पाहिजे व ज्या 12 हजार आंदोलकांवर राज्यभरामध्ये गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्यावेत, ही अपेक्षा आहे. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण मिळाल्याने आनंदच आहे. मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला मराठा समाजाची असलेली विदारक परिस्थिती अहवालाच्या माध्यमातून सादर केल्याने वस्तुनिष्ठ अहवाल दिल्याने आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे देखील यावल तालुका मराठा समाजाच्या वतीने तालुकाध्यक्ष अतुल पाटील यांनी आभार मानले आहेत.

Copy