महाराष्ट्राने काँग्रेसला संपवले

0

गोंडा : महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्राने त्यांच्या राज्यातून काँग्रेसला संपवले आहे. त्यांनी भाजपला कौल दिला, असा टोला लगावत उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला कौल द्यावा, असे आवाहन केले.

महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्याचे पडसाद उत्तर प्रदेसातील निवडणुकीवर उमटण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधानांच्या भाषणात त्याचीच चुणूक दिसून आली. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करतानाच त्यांन काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, उत्तर प्रदेसातील सत्तारूढ समाजवादी पक्षासह बहुजन समाज पक्षावरही टीका केली.

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल 11 मार्चला लागतील. त्यानंतर 13 तारखेला लगेचच होळी आहे. मात्र, त्यावेळी अवघा देश केशरी होली खेळेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. तसेच, या विधानसभा निवडणुकीत भाजपच विजय मिळवेल, असेही त्यांनी सूचित केले.

उत्तर प्रदेशचा विकास विरोधकांमुळेच रखडला आहे. येथे चोरीही लिलाव पद्धतीने होते. त्यासाठीही निविदा काढाव्या लागतात, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री अखिलेश यादव ऑस्ट्रेलियात शिकायला गेले. पण माझ्या गोंडा येथील गरीब नागरिकांचे काय होणार, याची मला चिंता आहे. अखिलेश यांचा शेतकर्‍यांवर राग आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यात 14 टक्क्यांपेक्षा जास्त विमा दिला नाही, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

वन रँक वन पेन्शनचा मुद्दाही पंतप्रधानांनी उपस्थित करत, नाव न घेता काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, यांना जवानांची समस्या काय आहे याची माहितीच नव्हती. जाता-जाता त्यांनी देशातील शूर जवानांची मस्करी केली. यापेक्षा जवानांचा अपमान होऊ शकत नाही.