महाराष्ट्रातील राजकीय पोकळी

0

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी होत चालली आहे, तर काँग्रेसही त्याच मार्गावर आहे. राज्यात अजून महापालिकांच्या निवडणुका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका बाकी आहेत. यासाठी जिकिरीचा जोर भाजपने लावला आहे. मित्रपक्षापासून सर्वांवर जाळे टाकून आपल्याकडे ओढण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. त्याला शिवसेनेचे नेतेही बळी पडत आहेत. शरद पवारांसारखे दिग्गज नेते या सर्व प्रक्रियेकडे डोळेझाक करत आहेत. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो आपापले मार्ग बदलू लागला आहे, अशात महाराष्ट्रात एखादा नवा पक्ष अथवा नवा प्रवाह जन्मास येऊ शकतो. तो येईल की नाही हे आता सांगणे कठीण असले तरी एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, हे वास्तव आहे. हे सक्षम लोकशाहीला नक्कीच पोषक नाही. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती नव्या राजकीय बदलांची.

महाष्ट्राच्या राजकारणात सध्या भाजप सर्वांवरच कुरघोड्या करताना दिसत आहे. त्यांनी शिवसेनेलाही बर्‍यापैकी दाबण्याचा प्रयत्न केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवले. हे निकालांनी दाखवले आहे. याचे श्रेय निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. या निवडणुकीचे दुसरे आणि आश्‍चर्यकारक वैशिष्ट्य असे की, काँग्रेसला कोणताही स्ट्राँग नेता नसतानाही हा पक्ष दुसर्‍या स्थानावर कसा काय आला याचे पत्रपंडितानाही आश्‍चर्य वाटले असेल. खरंच क्रमवारी लावायची असेल तर ती अशी लावायला हवी की प्रथम भाजप, दुसरी शिवसेना, तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेवटी काँग्रेस. राज्यातल्या विरोधीपक्षांना भाजपच्या लाटेने इतके कमजोर केले आहे की, त्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी बराच काळ जाईन असे मोदी भक्तांचे म्हणणे आहे. ते काहीअंशी बरोबरही आहे. त्याचे कारण असे आहे की, काँग्रेसचे राष्ट्रीयच नव्हे तर राज्यातील नेतृत्वही अगदी खंगल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस हा पक्ष वर्षानुवर्षे सत्तेत असल्याने आता नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याची सवय नाही. कोण आंदोलन करणार, प्रवाहाविरोधात कोण पोहणार? पोलिसांच्या लाठ्याकाठ्या कोण खाणार? असे अनेक प्रश्‍न आहेत. गेल्या साठ वर्षांपासून काही वर्षे सोडली तर हा पक्ष नेहमीच सत्तेत आहे. जुने म्हातारेकोतारे नेते तरुणांना संधीही देत नाही. दिली तर आपल्याच घरातील नेत्यांना तिकिटे देतात. पण, गांधी-नेहरू घराण्यावर कोणी काहीही म्हटले तरी आजही विश्‍वास आहे हे या ना त्या कारणाने सिद्ध झाले आहे. कालच बाळासाहेब विखे पाटील नावाचे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे एक वादळ शमले. त्यांच्या निधनाने जुन्या काँग्रेशी खोडांमधला मुरब्बी, धूर्त आणि धोरणी नेता हरपला आहे. महाराष्ट्रातल्या शरद पवार यांच्या विरोधातल्या काँग्रेशी धुरंधरांमध्ये त्यांचेही एक नाव प्रामुख्याने घेतले जाते. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्वाचा आहे. त्या जिल्ह्यात शंकरराव काळे, शंंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख, भाऊसाहेब थोरात, अशी अनेक दिग्गज मंडळी होऊन गेली. परंतु, सर्वांना पुरून उरणारा एकमेव नेता अशी बाळासाहेब विखे यांची ओळख होती. सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे साम्राज्य त्यांनी स्वतः उभे केले होते.

आता ती पिढी नष्ट होत चालली आहे. राज्यातील सध्या पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या खालोखाल काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसचे नेते एकमेकाच्या पायात पाय घालण्याचे जोपर्यंत थांबवत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावेच लागेल, असे आता खुद्द काँग्रेसचे नेतेच बोलू लागले आहेत. एकेकाळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेस संपली असे बोलले जात असताना भारताच्या राजकीय क्षितिजावर लाल बहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यानंतर सोनिया गांधी यांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास येत गेलेे. काँग्रेसला ऑक्सिजन देऊन या सर्वांनी प्राण आणला त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात खमके, नव्या दमाचे नेतृत्व उभे राहिले तर तेही विजयश्री खेचून आणू शकतात, असा भाबडा आशावाद कार्यकर्त्यांना वाटतो आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला ऑक्सिजन देणारा महाराष्ट्रातही एखादा नेता केव्हा उदयास येईल याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये लाथाळ्यांचे राजकारण आढळते आहे. अशोक चव्हाण, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली त्याप्रमाणे काँग्रेसमधील एकाही नेत्याने महाराष्ट्रात पुढाकार घेतला नाही. सर्वांना बरोबर घेऊन, केवळ नात्यागोत्याचा विचार न करणारा, स्वच्छ प्रतिमा असलेलं खणखणीत नाणं पक्षातल्या कार्यकर्त्यांना हवे आहे. सोनिया गांधी या जशा काँग्रेसचा ऑक्सिजन ठरल्या होत्या. तसेच मोदी हे भाजपचे सध्याचे टॉनिक आहे. आज राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा उदोउदो होत असला, तरी देशभरातील गावखेड्यातही मोदी इफेक्ट होतोच. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला बहुसंख्य नागरिकांचा पाठिंबा मिळतो हे वास्तव आहे. भले त्यांचे विरोधक काहीही म्हणोत. मोदी हे नाव इतके चर्चेत असते की त्यांनी छबी दिसताच भाजप कार्यकर्त्याला टॉनिक मिळते. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्था. कालच्या निवडणुकीचे श्रेय फडणवीस यांना द्यावेच लागेल. पण, या यशामागे मोदी हे नाव जोडल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाहीत. मोदी हे दोन शब्द जर वगळले तर भाजपचे काय?

महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टपणे स्वतःला भाजपसमोर सरेंडर करून घेतल्याचे चित्र आहे. मग राज्यात दुसरा विरोधी असा  प्रभावी पर्याय कोणता? परिस्थितीने तो नक्कीच निर्माण होईल. मनसेला तर खूपच मर्यादा आहेत. काँग्रेसला संधी आहे. परंतु, त्यांच्यातील यादवी संपण्यासारखे चित्र नाही. राज्यात अजून 13 महापालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत. यासाठी जिकिरीचा जोर भाजपने लावला आहे. मित्रपक्षापासून सर्वांवर जाळे टाकून आपल्याकडे ओढण्याचे तंत्र भाजपने अवलंबले आहे. त्याला शिवसेनेचे नेतेही बळी पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर खिळखिळी होण्याच्या मार्गावर आहे.
पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जो तो आपापले मार्ग बदलू लागला आहे, अशात महाराष्ट्रात एखादा नवा पक्ष अथवा नवा प्रवाह जन्मास येऊ शकतो. तो येईल की नाही हे आता सांगणे कठीण असले, तरी एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, हे वास्तव आहे. हे सक्षम लोकशाहीला नक्कीच पोषक नाही.

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248