महाराष्ट्रातील चौघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार

0

मुंबई । मानवांच्या संरक्षणासाठी आपल्या दैनंदिन जीवनात उत्तम कामगिरी बजावणार्‍या देशातील 36 व्यक्तींना 25 रोजी राष्ट्रपतीच्या अनुमतीने ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे.त्यात एकाला ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार ’ व तीघांना ‘ उत्तम जीवन रक्षा पदक जाहिर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2016’ हे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर 25 रोजी जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील गोविंद लक्ष्मण तुपे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि निलकांत रमेश हरिकांत्रा यांना जाहीर झाला आहे. तीन श्रेणीत हे पुरस्कार देशातील 36 नागरीकांना जाहीर झाले आहेत. यातील 7 व्यक्तिंना हे पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाले आहेत.‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 5 जणांना जाहीर झाले आहेत. ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 8 जणांना आणि ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ 23 जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

मानवी जीवन रक्षणासाठी कार्य
राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्रालय देशभरात आपल्या दैनंदिन जीवनात ज्यांनी दैदिप्यमान अशी मानवी जीवन रक्षणासाठी कार्य केलेले आहे. त्यांचे या पुरस्करासाठी शिफारस होत असते. त्यातुन निवड होवून राष्ट्रपती अंतीम मंजुरी घेतात.