महाराष्ट्राचा ३७० शी काय संबंध म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे: मोदी

0

अकोला : भाजपकडून महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात वारंवार कलम ३७० चा उल्लेख करत मत मागितले आहे. यावरून भाजपवर टीका होत असतांना मोदींनी टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली. अकोला येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते. कलम 370 हटवल्यामुळे विरोधक दु:खी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राजकीय स्वार्थासाठी लोक असे बोलत आहेत.

महाराष्ट्रात, मुंबईवर हल्ला करुन दहशतवादी शेजारील देशात जाऊन लपत होते. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवणारे देशाबाहेर कसे पळालेत? असा प्रश्न मोदींनी 2014 आधी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला. विरोधातील काही लोकांचे या माफीयांशी कसे संबंध आहेत. आता यांचं भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पडल्याने ते घाबरले आहेत. त्यांना वाटत असेल, ते सुटलेत मात्र प्रत्येक कृत्याचं देश उत्तर मागणार आहे, असा इशारा मोदींनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला विलंब लावणारे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे हेच लोक आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादाला आम्ही राष्ट्रनिर्माणाचं मुळ मानलं, हे स्वातंत्र्यवीर सावरकराचे संस्कार आहेत.