Private Advt

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

जळगाव/धुळे/नंदुरबार : दि. ११ जानेवारी २०२२

नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक  तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. आज ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने १० व ११ जानेवारी असे दोन दिवस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची  निवड केली. राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार अनिल राजदान यांनी काढले.

महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्ना चे फलित आहे. ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला.

महावितरणने राज्यात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा व वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात यशस्वी ठरली आहे. महावितरणने आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला असून यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी घेणे, मीटर रीडिंग पाठवणे, तक्रार नोंदणी करणे अशा अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. ईआरपी प्रणालीमुळे महावितरणच्या कामात अधिक पारदर्शकता व गतिशीलता आली आहे. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.