महाभारत मनुष्याच्या जीवनाचा आरसा

0

डॉ. नितीश भारद्वाज : ’म्युटेशन’ कार्यक्रमांतर्गत वार्तालापाचे आयोजन

पुणे : आपल्या जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही जी महाभारतात सांगितलेली नाही. महाभारतातील प्रत्येक पात्र एका मनुष्यासारखे वागते. महाभारतातील प्रत्येक पात्र हे वेगवेगळ्या स्वभावाचे आहे. रामायणामधून आपण भक्ती कशी असावी हे शिकलो. पण महाभारताने जीवन कसे जगले पाहिजे हे शिकवले. महाभारत ही एक जीवनाची कथा आहे. त्यामुळे महाभारत हे मनुष्याच्या जीवनाचा आरसा आहे, असे मत महाभारत या मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले.

महाभारत या दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या मालिकेला 30 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिवर्तन इव्हेंट्स आणि नॅशनल फिल्म अर्काईव्ह्ज ऑफ इंडिया यांच्यातर्फे म्युटेशन कार्यक्रमांतर्गत डॉ. भारद्वाज यांच्याशी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. गो. ब. देगलूरकर, प्रकाश मकदूम, कविता वर्तक, महेश वर्तक, प्रवीण गोखले याप्रसंगी उपस्थित होते.

महाभारताचे वाचन करणे गरजेचे

सध्याच्या पिढीला वाचनासाठी वेळ नाही. आपण जेवढे वाचन करू तेवढे आपल्याला अधिकाधिक गोष्टींचे आकलन होते. गुगलमध्ये माहितीचे केवळ संकलन होते. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे प्रमाण शोधायचे असल्यास अधिकाधिक पुस्तके वाचणे गरजेचे आहे. तरुण वयातच महाभारताचे वाचन करणे गरजेचे आहे. कारण याच वयात माणसाला कसे वागावे, हे समजले पाहिजे. रामायणाप्रमाणे घरी वागले पाहिजे, बाहेर वागताना मात्र महाभारताप्रमाणे वागायला हवे, असे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले.

मालिकांमधील गाभा हरवला

सध्याच्या मालिकांमधील गाभा हरवलेला दिसतो. त्या काळात महाभारत बनवताना प्रत्येकाने मेहनत घेतली होती. तसेच महाभारताचा अभ्यास देखील केला होता. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेतील संवाद. महाभारतातील संवाद खूप ताकदीचे होते. त्यामुळे आज देखील त्या मालिकेचे अढळ स्थान प्रेक्षकांच्या मनात आहे, असेही डॉ. भारद्वाज यांनी पुढे सांगितले.