महानगर पालिकेतर्फे हॉकर्सच्या जागा वाटपासाठी सोडत

0

जळगाव । शहरातील चित्रा चौक ते टावर चौक, चित्रा चौक ते गणेश कॉलनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गोंविदा रिक्षा स्टॉप येथील नोटरीधारक हॉकर्संचे सिव्हीक सेंटर व जैन मंदिराच्या मागील बाजूस स्थलांतर करण्यासाठी सोडत काढून या हॉकर्संला पर्यायी जागा महानगर पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली. ही सोडत महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर दुपारी 2 ते सायंकाळ 5 या वेळेत काढण्यात आली. याप्रसंगी अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान, संजय ठाकूर उपस्थित होते. या सोडतीत चित्रा चौक ते टावर चौक येथील 17 कापड विक्रेते हॉकर्स व 17 इतर हॉकर्स असे एकूण 34 हॉकर्स यांना टाईम झोन आखून देण्यात आला आहे. यातील 17 कापड विक्रेते दिवसभर जैन मंदिराच्या मागील बाजूस व्यवसाय करू शकणार आहेत.

तर येथील 17 नाश्ता विक्रेत, चहा विक्रेते, भेळपुरीवाले आदींना सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 6 ते 10 यानुसार टाईम झोन आखुन देण्यात आला आहे. जैन मंदिर मागील जागेत 4 बाय 6 जागा आखून देण्यात आलेली आहे. सिव्हिक सेंटर येथे 6 बाय 6 जागा आखून देण्यात आलेली आहे.

सिव्हीक सेंटर येथे 112 हॉकर्सला जागा
चित्रा चौक ते गणेश कॉलनी येथील 85 हॉकर्स यांना सिव्हीक सेंटर येथे जागा देण्यात आली आहे. यात भाजीपाला विक्रेते, फळ विके्रते, नाश्ता सेंटर चालविणारे यांना टाईम झोन आखून देवून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्यवसाय करावयाचा आहे. तर शिवाजी महाराज पुतळा व गोंविदा रीक्षा स्टॉप येथील 28 नॉन व्हेज विक्रेत्यांना संध्याकाळी 6 ते 10 सिव्हीक सेंटर टाईम आखुन देण्यात आला आहे. या सोडतीनंतर पावत्या तपासणे व इतर कागपत्र तपासणीचे सोपस्कर मंगळवारी पार पडल्यानंतर बुधवारी प्रत्यक्षात हे हॉकर्स त्यांना देण्यात आलेल्या जागेवर व्यवसाय करू शकणार आहेत. दरम्यान, या विक्रेत्यांनी स्थलांतर करण्यास मान्य केले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असल्याने 15 एप्रिलला स्थलांतर करू देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भांत हॉकर्स महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेणार आहेत. अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांनी जागा वाटप झाल्यानंतर बुधवार 12 एप्रिलनंतर जे हॉकर्स नेमून दिलेल्या जागांवर व्यवसाय करतांना आढळणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.