महात्मा फुले व डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान सन्मान रॅली

0

नंदुरबार। महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त समता युवा मंच, कोरीट नाका परिसर तथा डॉ.आंबेडकर जयंती उत्सव 2017 च्या समितीच्यावतीने सालाबादाप्रमाणे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने 11 एप्रिल रोजी 4 वाजता पंचायत समितीच्या आवारातील संविधान स्तंभाला अभिवादन करुन महिला संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान संविधान ग्रंथ दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, जि.प. अध्यक्ष रजनीताई नाईक, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, अनिता शिरीष चौधरी, नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र गावीत, संमेलनाध्यक्ष रमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संविधान ग्रंथ दिंडीचा मार्ग
पंचायत समिती, गांधी पुतळा, नेहरु चौक, नगरपालिका, शास्त्री मार्केट, सिंधी बाजार, महाराष्ट्र व्यायामशाळामार्गे महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येणार आहे. याठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुन रॅलीचा समारोप करण्यात येईल. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या अध्यक्षा दक्षा बैसाणे, कार्याध्यक्ष वंदना साळुंके, उपाध्यक्षा संगिता रामराजे, जनाबाई नरभंवर, अश्‍विनी पानपाटील, सचिव पुष्पा ढोढरे यांनी केले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मोटरसायकल रॅली
13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांच्या हस्ते रॅलीला निळा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. तहसील कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीला सुरुवात होईल व पुढे रेल्वे कॉलनीतील गौतम बुद्ध युवा सोशल गृपच्यावतीने स्वागत होवून महाराणा प्रताप पुतळा, नेहरु पुतळा, नगरपालिका जवळील शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तेथून पुढे अंधारे स्टॉप, मोठा मारुती चौक, दोशाह तकिया चौक यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात येणार आहे. तेथून पुढे मच्छीबाजार, काली मस्जिद, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन लहान माळीवाडा, मेहतर वस्ती, समता कॉलनी, हाटदरवाजा, उड्डाणपूल, सिंधी कॉलनी, गणेशनगर येथील कपिलवस्तु बुद्धविहार येथे सामुहिक बुद्धवंदना करुन रॅलीची सांगता होणार आहे.