महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना देणार

0

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय दाखले

जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका (रेशन कार्ड) नसलेल्या कुटुंबांना सक्षम प्राधिकाऱ्यांचा दाखला तत्काळ उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

श्री. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे, कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच नागरिकांना आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा म्हणून मर्यादित कालावधीकरीता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून जे रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड सादर करू शकणार नाहीत, अशांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना , राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांचेकडील 5 जून 2020 रोजीच्या पत्रानुसार तालुका स्तरावर कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबाना तहसीलदारांकडून दाखला देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तालुका कार्यालयांकडून कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

मात्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या काही रुग्णांकडे रेशन कार्ड नसल्याने तहसीलदारांचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने अथवा दाखला वेळेत सादर न करु शकल्याने या योजनेचा लाभ मिळत नाही, असे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून असे दाखले देण्यात येत आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 33 नोंदणीकृत रुग्णालया मार्फत कोविड-19 रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी आरोग्यविषयक हमी व आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्याकरीता संबंधित रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांचेमार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत.

ज्या रुग्णांकडे रेशन कार्ड नसेल अशांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांनी विहीत नमुन्यातील घोषणापत्र रुग्णालय प्रशासनाने भरुन त्यावर कुटुंबातील सदस्याचे पूर्ण नाव व स्वाक्षरी घेवून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्याकडील ई-मेल आयडी [email protected] या ई-मेल आयडीवर अथवा Whatsapp क्रमांक 9637616730 वर पाठवावयाचा आहे. विहीत घोषणापत्राचा नमुना संबंधित नोंदणीकृत रुग्णालयाकडून भरून स्वाक्षरीनिशी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास ईमेल द्वारे सादर करावयाचा आहे.

त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने सादर केलेली रुग्णाची माहिती तपासुन सदर रुग्णासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला (उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अथवा तहसीलदार, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्यापैकी एका अधिका-याच्या स्वाक्षरीने) जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात येईल. हा दाखला रुग्णालय प्रशासनाच्या ई-मेल आयडीवरच पाठविण्यात येईल.

रुग्णालय प्रशासनाने संबंधीत रुग्णास तातडीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार करावयाचे आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्ण जर कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड सादर करु न शकल्यास सदर रुग्ण योजनेच्या लाभापासून वैद्यकीय उपचारापासून वंचित रहाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी नोंदणीकृत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनाही सूचना दिल्या आहेत.

Copy