महात्मा गांधी मानवाला मानवतेचे जीवन सूत्र देऊन गेले – डॉ.उदय कुलकर्णी

0

जळगाव: “ काळाच्या पलीकडे पाहणारे आणि मानवतेला माणुसकीचे सुंदर तत्वज्ञान देणारे महात्मा गांधी, पुथ्वीला पडलेले अविस्मरणीय स्वप्न होते. त्यांनी मानवाला मानवतेचे जीवन सूत्र दिले. करणी व कथनी यामधील एकरूपता त्यांच्या आचरणाचा सर्वांगसुंदर पैलू होता. मानवाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न येणाऱ्या मानवी पिढ्यांसाठी शिदोरी आहेत. त्यांचे विचार आणि कार्य न विसरता आपण आपल्या देशाला आणि विश्वाला एकतेच्या सूत्रात गुंफले पाहिजे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेवून ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे. शेवटी आपण भौतिकवादाच्या अति आग्रहामुळे स्वत:च्या आवश्यक जीवन मूल्यांची सतत हत्याच करत आहोत. त्यातून फक्त गांधी तत्वज्ञानच मुक्ती देवू शकते. महात्मा गांधी यांनी भारतीयच नव्हे, तर जगातील उद्दात्त मूल्यांचा मंत्र आपल्याला दिला आहे, त्याची सिद्धता आपल्या माणुसकीमधून करूयात.” असे विचार मू.जे.चे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी ‘मंगल प्रभात आणि बापू स्मरण या कार्यक्रमात व्यक्त केले.

मूळजी जेठा महाविद्यालयात आज महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महात्मा गांधी अध्ययन केंद्र, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि स्वरदा संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मंगल प्रभात आणि बापू स्मरण’ हा भजन, गीत गायन आणि अभिवादनाचा कार्यक्रम सकाळी ८.३० वाजता ह्युमॅनिटी बिल्डींग समोर आयोजित करण्यात आला होता, ज्यात – वैष्णव जन ते तेणे कहिये-जे पीर पराई जाने रे…, इतनी शक्ति हमें देना दाता … , ऐ मालिक तेरे बन्दे हम…,

तू बुद्धि दे तू तेज दे .. नव चेतना नव विश्वास दे…, एक तू हि भरोसा…. हे ईश्वर, या अल्लाह… हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे….माणसाने माणसाशी माणसासम वागणे, उधळीत ये शतकिरणा या अशा काही प्रेरणादायी गीतांचे स्वरदा संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा.विजय लोहार यांनी या गीतगायन कार्यक्रमाचे निवेदन केले.

या संगीतमय कार्यक्रमानंतर मू.जे.च्या प्राध्यापक, रा.से.यो.चे आणि वसतिगृहाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी ‘स्वच्छ मू.जे. निर्मल मूल्जियन्स’ अभियानाअंतर्गत संपूर्ण मू.जे.महाविद्यालाय्च्या परिसरामध्ये स्वच्छता केली.

कार्यक्रमाच्या आरंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला डॉ.उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, डॉ. देवयानी बेंडाळे, प्रा.योगेश महाले, प्रा.दिलवरसिंग वसावे, प्रा.विजय लोहार, प्रा.कपिल शिंगाणे आणि वर्धिष्णू सामाजिक संस्थेचे अद्वैत दंडवते यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे अभिवादन करण्यात आले. त्यांनतर अद्वैत दंडवते यांनी जळगाव शहरतील कचरा वेचणाऱ्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत असलेल्या आपल्या वर्धिष्णू संस्थेची ओळख दिली, तसेच सामाजिक कार्यात महात्मा गांधींचा आदर्श आणि विचार किती महत्वाचा भाग आहे, याविषयी आपले अनुभव सुद्धा सांगितलेत.

सदर कार्यक्रमाला प्रा. देवेंद्र गुरव, प्रा.अनिल क्षीरसागर, श्री. महेश चिरमाडे, श्री. दिलीप कोळी तसेच संगीत विभाग, मुला-मुलींचे वसतिगृह आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते.