महाड इमारत दुर्घटना: तब्बल ४० तास चालले बचावकार्य

0

महाड: रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील तारीक पॅलेस ही निवासी इमारत सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोसळली. काही क्षणात ही इमारत जमीनदोस्त झाली. दुर्दैवाने या घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यात ७ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बचावकार्यात एका ४ वर्षीय चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरु झाले. तब्बल ४० तासानंतर हे बचावकार्य थांबले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.

महाड येथील काजळपुरा येथील तारीक गार्डन हि इमारत २४ ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास कोसळली होती. यात २५ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. यानंतर स्थानिक बचाव पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी मदत व बचावकार्य सुरु केले होते. सलग ४० तास हे मदत व बचावकार्य सुरु होते. सर्व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळावर तळ ठोकून होत्या.

२४ ऑगस्टला आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. यात एकाचा मृत्यू झाला होता. २५ तारखेला मध्यरात्री एक वाजेपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी मदत व बचाव कार्याचा ताबा घेतला. दुपारी बारा वाजता पहिला मृतदेह आढळून आला. नंतर टप्प्याने १४ मृतदेह हाती लागत गेले. चार वर्षाचा मोहम्मद बांगी याला दुर्घटनेच्या १८ तासांनंतर तर ६० वर्षाच्या मेहरुनीसा अब्दूल हमीद काझी यांना २६ तासांनंतर ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. हे दोघही भीषण दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावले. सकाळी २६ ऑगस्टला सकाळी दहा वाजेपर्यंत उर्वरीत दोन बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यानंतर हे मदत व बचावकार्य थांबविण्यात आले.

 

Copy