महसूल अन् पोलीस प्रशासनात कारवाईचा खेळ रंगला

0

अखेर 13 ट्रक गौण खनिज प्रकरणी गुन्हा दाखल
नवापूर: शहराच्या महामार्गालगत वाळूने भरलेला ट्रक महसूल आणि पोलीस प्रशासनाने पकडला होता. पकडलेल्या 13 वाळूची वाहने तहसील कार्यालयासमोर आणून ठेवली होती. लांबच लांब ट्रकांच्या रांगांसह त्यांचे चालक अशी एकच जत्रा भरली होती. ट्रकांची वाळू राँयल्टी भरली होती.त्यानंतर प्रश्न होता कारवाई होते किंवा नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. वाहनांवर कारवाई करण्याबाबत महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्यात कारवाईचा खेळ रंगला होता. दोन्ही एकमेकांकडे बोट दाखवत होते. अखेर नवापूर येथील मंडळाधिकारी नागेश मोतीलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन रंगलेल्या कारवाई नाट्याच्या प्रश्नावर पडदा पडला.

मंडळाधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल
गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर येथून जिल्हा मार्गे वाळू घेऊन जाणार्‍या 13 ट्रक पोलिसांनी नवरंग रेल्वेगेटजवळ तर काही महामार्गावर पकडून कारवाईचा चेंडू तहसीलदारांकडे टाकला होता, मात्र, तहसीलदारांनी कारवाईबाबत स्पष्ट भूमिका न घेता पोलिसांकडे हात दाखवला होता.रात्रभर तहसील कार्यालयासमोर वाळूचे ट्रक उभे होते. चालकही दिवसभर थांबुन होते. सकाळी पुढची प्रक्रिया होणे अपेक्षित असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ‘तुम्ही ट्रक पकडले, कारवाई पण तुम्ही करा, आमचे पकडण्याचे काम असून गौण खनिजाबाबत महसूल विभागाने कारवाई करावी’ या पोलीस व महसुलातील ‘तू तू-मैं मैं’ असे करत पूर्ण दिवस गेला. शेवटी मंडळाधिकारी मोतीलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात जिल्ह्यात वाळू वाहतूक बंदी असताना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तहसीलदार ‘नॉटरिचेबल’
गुजरातमधील वाळू जिल्हामार्गे नेण्यास बंदी असतानाही वाहतूक कशी झाली, हा प्रश्न चर्चेत आहे. नवापूर मार्गे काही रस्त्याने ही वाळू पाठवण्याचे काही वेगळे डाव नव्हते ना? वाहने पकडूनही तहसीलदार नॉटरिचेबल होते. कारवाईचे अधिकार तहसीलदारांना असतानाही त्यांनी दिवसभर पुढाकार का घेतला नाही, अशा अनेक प्रश्नांची दिवसभर चर्चा सुरू होती.
वाळू वाहतूकच्या नियमानुसार करण्यात येत होती. सर्व प्रकारच्या रॉयल्टी भरल्या आहे, असे वाहतूक करणार्‍यांनी पत्रकारांना सांगितले. वाळूच्या वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे. वाहतूक करताना अधिक वेगाने वाढ होत असल्याने वाळू वाहतुकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. निझर येथून औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे, पुणे, लातूर या ठिकाणी वाळूचे भरलेले ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रक चालकांना विचारणा केली. त्यांच्याकडे वाहतूक वाळू संदर्भात सर्व कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात बंदी असताना वाळूचे ट्रक जात असल्याने कारवाई केली आहे.

Copy