महत्वाच्या बैठकीला अधिकार्‍यांची अनुपस्थिती

0

नवापूर। नवापूर पंचायत समितीच्या महत्वाच्या बैठकीला काही विभागाचे खाते प्रमुख अथवा प्रतिनिधी अजेंडा देऊनही उपस्थित राहत नसल्याची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत यांनी केली आहे. नुकतीच पंचायत समितीची बैठक झाली यावेळी दिलीप गावीत यांनी माहिती देताना सांगितले की पेसा अंतर्गत संपूर्ण तालुका आदिवासी असुन पेसा अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांनी पंचायत समितीच्या बैठकीला उपस्थित राहून संपूर्ण माहिती खाते निहाय देणे बंधनकारक आहे. असे असतांना वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, तहसील कार्यालय या विभागातील संबंधित खाते प्रमुख अथवा प्रतिनिधी दर मिटींगला अजेंडा मिळूनही उपस्थित राहत नाहीत.

सदस्यांना विश्‍वासात न घेता कारभार
वास्तविक जनहिताची माहिती संबंधित खात्यातून मिळत असते. विशेष करून वन विभागाचे खाते प्रमुख अथवा प्रतिनिधी मागील सहा महिन्यात झालेल्या मिटींगला गैरहजर होते. अजेंडा देऊन ही कोणी येत नाही या विभागाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पदाधिकारी व सदस्य यांना विश्वासात घेऊन काम केलेले नाही. परस्पर वन समितीचा ठराव करून लोकोपयोगी साहित्य वाटपाचे काम सुरू केले आहे. सन 2009-10 या आर्थिक वर्षांत गॅस सिलिंडर साठी पैसे भरलेले असतांना सन 2013-14 या वर्षांत ज्यांनी पैसे भरले त्यांना गॅस सिलिंडर वाटप सुरू आहे. वन विभागात कुठले काम केव्हा होते तेच कळत नसल्याची मिश्कील प्रतिक्रीया तसेच तक्रार त्यांनी केली आहे. यासंबंधित विभागाची गंभीर तक्रार आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचे दिलीप गावीत यांनी यावेळी सांगितले