मला ड्रग माफिया दाखवून तुरुंगात टाकण्याचा डाव होता : आमदार गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

जळगाव : मला ‘ड्रग माफिया’ दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता मात्र रेकॉर्डींगमुळे सर्व सत्य बाहेर आले असून सीबीआय आता ती चौकशी करणार असल्याने आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा दावा माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांविरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी राज्यातील पोलिसांकडून काढून घेत आता सीबीआयकडे देण्यात आली आहे.

रेकॉर्डींगमुळे उघड झाले षडयंत्र
आपल्या वाहनात ड्रग टाकायचे, ते पकडायचे आणि आपल्याला ड्रग माफिया म्हणून घोषित करून तुरूंगात टाकायचे, असे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला लाजवेल, असे षडयंत्र आपल्याविरुद्ध रचण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याचा तपास चौकशी आता ‘सीबीआय’कडे दिला आहे, असे आमदार महाजन यांनी सांगत पुढे सांगितले की, माझ्याविरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता.

भाजपा संपवण्याचा डाव उधळला
याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधी मंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले. यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता मात्र तो सर्व रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला. हे प्रकरण चौकशीसाठी ‘सीबीआय’कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती मात्र महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, आता आमचे सरकार आले आहे, आम्ही ही सर्व चौकशी ‘सीबीआय’कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा दावाही महाजन यांनी केला.