मलकापुरात मिरवणुकी दरम्यान वाद; वाहनांची जाळपोळ, दगडफेक

0

बुलडाणा- ईद ए मिलाद मिरवणुकी दरम्यान वाद होऊन मलकापुरात वाहनांची जाळपोळ व दगडफेकीचा प्रकार घडला. यात आमदार चैनसुख संचेतींसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष हरिश रावळ यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी अश्रू धुराचा मारा तसेच हवेत गोळीबार करून जमावाला पांगविण्याच प्रयत्न केला. अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. सकाळी दहा वाजेनंतर शालीपुरा भागात वाद उद्भवून शहरभर त्याचे पडसाद उमटले. मोठ्या प्रमाणात दगडफेक व गोंधळ उडाल्याने तत्काळ बाजारपेठा, दुकाने बंद झाली. रात्री उशीरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. शहरात कर्फ्यू लावण्यात आला होता. दरम्यान, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे मलकापुरात तळ ठोकून आहे.

21 पोलीस जखमी

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मलकापुरातून ईद ए मिलाद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी दहा वाजेच्या सुमारास शालीपुरा भागात मिरवणूक आल्यानंतर वाद उद्भवला व क्षणात दगडफेक व धावपळ सुरू झाली. शहरात दंगलसदुश्य परिस्थिती निर्माण झाली. तत्काळ दुकाने बंद करण्यात आले. काही अज्ञातानी चार ते पाच वाहानांची जाळपोळ केली तसेच दगडफेक करण्यात आली. यात डीवायएसपी साळुंखे यांच्यासह सात अधिकारी व 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. दरम्यान, या दगडफेकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष हरिश रावळ जखमी झाले. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाली माहिती मिळाली.

हवेत गोळीबार
जाळपोळ व मोठ्या प्रमाणाव दगडफेक होत असताना जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांचा मारा केला तसेच हवेत आठ राऊंड फायर केले. शहरात तात्काळ संचारबंदी लागू करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नेमका वाद काय झाला हे मात्र, उशीरापर्यंत समोर येऊ शकले नव्हते.

आमदारांवर दगडफेक
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शांततेचे आवाहन करण्यासाठी आमदार चैनसुख संचेती गेले असतान त्यांच्यावर काही अज्ञातांनी दगडफेक केली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायाला जखमा झाल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मलकापुरात धाव घेऊन अधिकारी व कर्मचार्‍यांना सूचना दिल्या व शांततेचे आवाहन केले.

अडावदला दगडफेक
चोपडा- अडावद येथे ईदे मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अज्ञतांनी दगडफेक केल्याने तीन जण जखमी झाले. छोटू माहेबुब पिंजारी, राजेश जहांगीर तडवी,अल्ताफ खा रहीम खा कुरेशी ही जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभाग होता. वरिष्ठांनी घटनेनंतर शांततेचे आवाहन करीत शांततेत पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर व अतिरिक्त पोलीस निरीक्षक नंदकुमार ठाकूर आणि चोपड्याचे उपविभागीय अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. मुस्लिम समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांना झालेला प्रकार सांगितला आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. जे दोषी असतील त्यांचावर कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.