मरावे परी अवयवरुपे उरावे… अमरत्वाचा अवयवदान मार्ग!

0

नाशिक : नाशिकमध्ये रस्ते अपघातामध्ये ब्रेनडेड झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याची तयारी दर्शवल्यामुळे रविवारी दोन गरीब गरजूंना नवीन जीवदान मिळाले. त्या व्यक्तीचे हदय तत्काळ जळगावला तेरा वर्षांच्या गरीब मुलीला बसवण्यात आले, तर यकृत मुंबईतील केईएम रुग्णालयात पाठवून आणखी एका व्यक्तीला जीवन जगण्याची सुवर्णसंधी मिळाली.

ग्रीन कॉरिडॉरद्वारे तातडीने अवयवांचे वहन
नाशिक येथील रस्त्यात अपघात झाल्याने उपचारांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्ताला दाखल करण्यात आले होते. मात्र ती व्यक्ती ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यावर त्या व्यक्तीच्या पत्नीने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील गरजू पेशंटचा शोध सुरू झाला. त्याचवेळी रुबी हॉस्पिटलमध्ये तेरा वर्षांची मुलगी हृदयाच्या प्रतीक्षेत होती. त्यामुळे अपघातग्रस्त त्या व्यक्तीचे हृदय तत्काळ विमानाने लोहगाव विमानतळावर आणण्यात आले. तेथून अवघ्या सात मिनिटांत रुबी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे हृदय नेण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून ग्रीन कॉरिडॉरद्वारे केईएम हॉस्पिटलमध्ये यकृत अडीच तासांत आणण्यात आले.

यशस्वी यकृत, हृदय प्रत्यारोपण
तेरा वर्षांची ही मुलगी मूळची जळगावची. गेल्या वर्षीच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तिला कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाचा आजार झालेला आहे. तिच्यावर उपचारासाठी तिच्या आईसह ती अनेक हॉस्पिटलमध्ये चौकशी करून आली. परंतु, सर्वत्र निराशा आली. अखेर रुबी हॉस्पिटलमध्ये ती मुलगी उपचारांसाठी आली. दोन महिन्यांपासून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती सुधारली होती. त्यानंतर हृदयप्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकवरून मिळालेले हृदय रुबी हॉस्पिटलला आल्यानंतर 10 वाजून 22 मिनिटांनी तिच्यावर प्रत्यारोपणासाठी सुरुवात करण्यात आली आणि यशस्वी झाली. तर दुपारी साडेबारा वाजता ग्रीन कॉरिडॉरद्वारे यकृत केईएम हॉस्पिटलला आले. तेथे 47 वर्षांच्या एका पेशंटला दोन वर्षांपासून लिव्हर सिरॉसिसचा आजार होता. यकृत मिळविण्यासाठी सहा महिन्यांपासून त्याची प्रतीक्षा होती. नाशिकवरून यकृत मिळताच त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.