मराठी जपणाऱ्यांना जपा!

0

आज मराठी भाषा दिन. कुसुमाग्रज म्हणून तुम्हा आम्हा सर्व मराठी भाषिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या वि.वा.शिरवाडकरांचा जन्मदिवस.

दिवस म्हटला की तो साजरा केला जातोच जातो. मराठी भाषा दिनाचेही तसेच आहे. आपल्या मायबोलीचा, मराठीचा दिवस. स्वाभाविकच आज जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे तेथे मराठी भाषा दिन साजरा होणारच. महाराष्ट्रात तर रविवारपासूनच सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. सरकार आणि सरकारी विभागांच्यावतीने मराठी दिवसाचे सोहळेच सोहळे असतील.

राज्यातील मुंबईसह ११ विद्यापीठे मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
मुंबई विद्यापीठानेही दणक्यात दहा लाखी सोहळा आयोजित केला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सर्व कुलगुरुंचे कौतुकच! आपल्या मायबोलीचे कौतुक संत ज्ञानेश्वर माऊलींनीही केले आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

अशा अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मायमराठीसाठी एकट्या मुंबई विद्यापीठाने दहा लाख खर्च करुन सोहळा साजरा करण्यात काहीच गैर नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी चीनी भाषेसाठीही मोठा कार्यक्रम घेतला होताच. त्यामुळे मराठीसाठी केलेच पाहिजे.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

या शब्दात सुरेश भट यांनी ज्या मराठीचा गोडवा गायला आहे. त्या आपल्या मराठीसाठी असे सोहळे केलेच पाहिजेत. पण हे सोहळे साजरे करताना एकच प्रश्न मनाला अस्वस्थ करतो तो म्हणजे, हे सारे ज्या मराठी भाषेच्या नावाने केले जात आहे त्या मराठी भाषेला खरोखर जपते आहे तरी कोण?

मराठी भाषेला साहित्यिकच जपतात? पत्रकारच जपतात? प्राध्यापकच जपतात? राजकारणीच जपतात? मला नाही वाटत यापैकी कोणाचीही हिंमत होईल तेवढे खोटे बोलण्याची! हे वर्ग मराठीसाठी थोडेफार करतात, नाही असे नाही. मात्र जर त्यांच्या करण्यातून स्वार्थ साध्य होत नसेल तर मात्र त्या वर्गातील किती मराठीला जपू पाहतील याची शंकाच वाटते.
मराठी भाषा, मराठी संस्कृती खरी जपतात ते ती लोक जी मराठी भाषा, मराठी संस्कृती खरीखुरी जगतात! ती या वरील वर्गांपैकी खूप कमी आहेत. ती बहुसंख्य आहेत सामान्यातील सामान्य. त्यातील काहींना तर आपण अडाणी म्हणून हिणवतही असू. मात्र तेच खरे मराठीला जपतात. मराठीला टिकवून ठेवतात.

मराठी भाषा दिन साजरा करताना भव्य-दिव्य सोहळे साजरे होत असताना मनाला अस्वस्थता वाटते ती यावर्गासाठीच! यावर्गासाठी आपण काय करत आहोत. मराठी भाषा जगली तरच मराठी भाषेचे भले असे ज्यांना वाटत असेल त्यांना वाटो. प्रत्यक्षात मराठी माणूस जगला, सुखी-संपन्न राहिला, त्याचे भले झाले तर आणि तरच मराठी भाषेचे, संस्कृतीचेही भले, हे न नाकारता येणारे वास्तव आहे! त्यामुळेच सरळ-स्पष्ट प्रश्न आहे तो हाच मराठी भाषा जपणाऱ्यांना जपण्यासाठी आपण काय करत आहोत? मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी दहा लाख खर्च करणारे मुंबई विद्यापीठ मराठी विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी काय करत आहे? कुलगुरु जगभर फिरुन ज्ञान गोळा करतात. पण तो जागतिक दर्जा गरजू मराठी विद्यार्थी राहतात त्या वसतिगृहालाही लाभावा, असे त्यांना का वाटत नाही बरे?

शिक्षणमंत्री विनोद तावडे एक उत्साही राजकारणी. खूप धडाडीने वेगवेगळे प्रयोग राबवतात. त्यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांनी जी मांडणी केली आहे ती सुद्धा मराठीची महती सांगणारीच! मात्र केवळ सोहळे साजरे करण्याबाहेर जाऊन मराठी शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी काही ठोस योजना खरोखर ते राबवणार आहेत?
शिवसेना, मनसेसारखे मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी अवतरलेले पक्ष. त्यांचेही कार्यक्रम असतील. आता लगेच निवडणूक नसल्याने तेवढे भव्य-दिव्य नसतीलही. पण असतीलच. ते सुद्धा सोहळ्यांच्याबाहेर जाऊन काही करणार आहेत का?
या सर्वांनी एकत्रितपणे खूप काही करता येईल. पहिले पाऊल एक सुचवावेसे वाटते. ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू मराठी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सर्वसुविधायुक्त वसतिगृह बांधली, नव्या काळाच्या नव्या शिक्षणाची सोय करुन दिली तरी पुढची मराठी पिढी प्रगतीच्या महामार्गावर अधिक वेगाने सरसावू शकेल. सोलापुरात शंकरराव मोहिते पाटिल यांनी तसे त्याकाळी बांधले होते. नवी मुंबईसारथ्या महानगरात राजस्थान, ईशान्येतील राज्यांचीही भवने दिसतात. महाराष्ट्र सदनाचा भूखडं ओस पडलेला आढळतो. अशा भूखंडांवर मुंबईतील मोठे वसतिगृह बांधले तर एखाद्या चमणकरांची नाही तर लाखो मराठींची गरजूंची खरीखुरी प्रगती होईल.

काहींना हे विचित्र वाटेल. मराठी भाषा दिनी हे काय लावले आहे. मात्र मराठी भाषा जपली जाते ती मराठी माणसांमुळे, ते टिकले तर मराठी भाषाही टिकेल. त्यांची प्रगती झाली, तर मराठी भाषेचीही प्रगती होईल. त्यामुळे केवळ प्रासंगिक सोहळे साजरे न करता काही ठोस पावलेही उचला.

जाता जाता कुसुमाग्रजांच्या ओळींची आठवण करुन देतो…

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे