मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड

0

41 कार्यकर्त्यांची अटक आणि सुटका

पिंपरी : आरक्षणाच्या मुद्यावरून विधानभवनाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. मुंबई-बंगळूर महामार्गावर पुनावळे येथील एका हॉटेलमध्ये कार्यकर्ते जमले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालून सरकारचे लक्ष वेधणार होते. मुंबईला जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते पुनावळे येथील एका हॉटेलमध्ये जमणार होते. पोलिसांना याची खबर लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मुंबईला निघालेल्या 41 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य मुंबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. तळेगाव पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर बंदोबस्त ठेवला.

Copy