मराठा आरक्षण: ‘संवाद’ यात्रा आज विधानभवनावर धडकणार !

0

मुंबई-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेली संवाद यात्रा आज विधान भवनावर धडकणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक विधानभवनावर धडकणार आहेत. तर दुसरीकडे या संवाद यात्रेसाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या भागांमधील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज झाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला होता. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी संवाद यात्रा काढण्याची घोषणा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली होती. ही यात्रा आज सोमवारी विधान भवनावर धडकणार आहे. या संवाद यात्रेत सामील होण्यासाठी निघालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.

संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई ते दहिसर दरम्यान असलेल्या वर्सोवा येथील नवीन पुलाचे दुरुस्ती काम आज ऐवजी उद्यापासून (मंगळवारी) सुरुवात केली जाणार आहे.

Copy