मराठा आरक्षणावर आज सुर्प्रीम कोर्टात सुनावणी !

0

मुंबई: राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरम्यान मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

दोन्ही याचिकांवर आपली बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक झाली.

मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

१ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले.

Copy