मराठवाड्यात दुष्काळ जाहिर करून तातडीने उपाययोजना करा – धनंजय मुंडे

0
मुख्यमंत्र्यांची भेट घेवून दिले निवेदन
मुंबई : सप्टेंबर अखेर पर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कोरडा दुष्काळ जाहिर करून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आ.जयवंत जाधव यांच्यासह त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या बाबतचे निवेदन दिले.
राज्यात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी ग्रामस्थ करत आहेत. शासन स्तरावर मात्र दुष्काळी परिस्थिती बाबत कोणालाही गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आ.जयवंत जाधव यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार, दि.२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दुष्काळी परिस्थिती बाबत तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. मराठवाड्यातील दुष्काळाबाबत त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा करून पंधरा दिवसांत दुष्काळ जाहिर करावा अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा, पिकांचे पंचनामे करून आनेवारी जाहिर करावी, ग्रामीण भागात मागणीनुसार टँकर उपलब्ध करून टँकर मंजुरीसाठी सध्याच्या अटी शिथिल कराव्यात, बोंडअळी अनुदान, पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम आदी थकीत शासकीय अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, चारा डेपो आणि चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडी धरणाच्या कालव्यातून शेतकर्‍यांना किमान पाच पाणी पाळ्यांचे नियोजन करावे, पिक कर्ज व इतर वसुलीला स्थगिती द्यावी यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी देण्यात आले. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झाला असून त्याला दिलासा देण्यासाठी शासनाकडून तातडीची उपाययोजना होणे गरजेचे आहे.
सध्या शेतकर्‍यांमध्ये शासन विरोधी तिव्र असंतोष असून पंधरा दिवसांत दुष्काळ जाहिर होवून या बाबतच्या उपाययोजना न झाल्यास लोक शासन विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्यासह माजी आ.जयवंतराव जाधव होते.
Copy