मरकळमधील जागृती अंधशाळेला केली आर्थिक मदत

0
लायन्स क्लब ऑफ पूनाने राबविला उपक्रम
निगडी : आळंदी परिसरातील मरकळ येथील जागृती मुलींच्या अंधशाळेला लायन्स क्लब ऑफ पूना निगडीने प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते संगीत वाद्यासह ही मदत देण्यात आली. या शाळेसाठी शालेय साहित्य मानद अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर यांच्याकडे सुपूर्त केले. तसेच 25 हजार रूपये मदतीचा धनादेशही यावेळी त्यांच्याकडे देण्यात आला. ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करत याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे होते. याप्रसंगी प्रशांत व मंजिरी कुलकर्णी, दिलीपसिंह व मीना मोहिते, संजय व सविता निंबाळकर, जयश्री मांडे, अजय देशपांडे, चंद्रशेखर पवार, मंत्री आदी पाहुणे उपस्थित होते.
शाळेच्या सेवेचे केले कौतुक
यावेळी एम.जे.एफ. हेमंत नाईक यांनी मुख्याध्यापिका वानखेडे यांच्याकडे क्राफ्ट पेपर दिले. जागृती शाळेच्यावतीने अंध मुलींना गेल्या 14 वर्षांपासून शिक्षण दिले जाते. रमेश शहा यांनी शाळेच्या अखंडित सेवेचे कौतुक केले व प्रांताकडून संपूर्ण सहकार्याचे आश्‍वासन दिले. ही अखंडित सेवा एम.जे.एफ. अशोक व उषा येवले परिवाराकडून चालू आहे. दरम्यान, ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्यावतीने रक्तदान शिबीर, निगडी येथील वाहतुक विभागातील पोलिसांना डोळ्यात टाकण्याचे पंचगव्यनिर्मित आयुर्वेदिक औषधाचे मोफत वाटप, निगडी परिसरातील मंदिरात डस्टबीनचे वाटप, शाहूनगर येथील उद्यानात 100 रोपांची लागवड आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जागृती अंधशाळेच्या सर्व मुलींनी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागतपर गीत गायले. या मुलींना अंधशाळेच्या शिक्षकांनी राखी बनविण्यास तसेच दिपावलीसाठी मेणाचे दिवे, आकाशकंदील आणि आकर्षक पणत्या बनविण्यास शिकवितात. त्यामुळे मिळालेले पैसे शाळेच्या खर्चासाठी वापरण्यात येतात. यामुळे या मुलींना नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. पुढील आयुष्यात त्यांना स्वावलंबनासाठी या प्रशिक्षणाची मदत होते.
Copy