मनोहर पर्रिकर चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी

0

पणजी : मनोहर पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी शपथ दिली. मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. फ्रान्सिस डिसुजा, पांडुरंग मडकेकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर, मनोहर त्रिंबक आजगावकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, विनोद पालेकर, अपक्ष गोविंद गावडे, रोहन खवंटे यांच्यासह तेरा जणांनी शपथग्रहण सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

काँग्रेसची घोषणाबाजी
पर्रिकर आणि त्यांच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान काँग्रेसचे 17 आमदार दिग्विजय सिंह यांच्यासह राजभवनात आले व त्यांनी काँग्रेस हा गोवा विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असून आम्हाला सरकार बनवण्याचे पहिले आमंत्रण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राजभवनाबाहेर घोषणाबाजीही करण्यात आली. गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने स्थगितीऐवजी गोवा विधानसभेत भाजपाला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

छोट्या पक्षांना घेऊन भाजप मोट
भाजपाप्रणीत आघाडीकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष तीन मिळून एकूण 23 आमदारांचे संख्याबळ आहे. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाचे 13 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसचे संख्याबळ 17 आहे. असे असतानाही भाजपाने छोटया पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे.