मनुष्य जीवनात येणार्‍या अडचणीत नामस्मरण प्रभावी साधन

0

फैजपूर : आपल्याला देवाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहे परंतु सर्वांना सोयीचा मार्ग हा नामचिंतन आहे. भगवंताचे नामस्मरण हा एकदम सुलभ व सोपा मार्ग असून मनुष्य जीवनात येणार्‍या प्रत्येक अडचणीत नामस्मरण प्रभावी साधन असल्याचे अनेक दाखले देवून प.पू. घुले महाराजांनी पटवून दिले.

येथील श्री एकनाथी भागवत पारायण व कीर्तन सोहळ्याच्या सहाव्या दिवशी प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार तथा श्रीक्षेत्र देहु येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष हभप पांडूरंग महाराज घुले यांच्या रसाळ व श्रवणीय वाणीतून धर्ममंडपातील उपस्थित हजारो तरुण-तरुणी, भाविक भक्तांनी चिंतनाचा आनंद घेत खर्‍या अर्थाने वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा आनंद द्विगुणीत केला.

भारतीय संस्कृती जगात सर्वोत्कृष्ट
महाराज म्हणाले की, आपली भारत भूमी संतांची भूमी आहे. भारतीय संस्कृती जगात सर्वोत्कृष्ट आहे. 31 डिसेंबर म्हटले की, पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन अनेक तरुण रात्रभर धिंगाणा घालतात. परंतु या फैजपूर नगरीत शेकडो तरुण-तरुणी या ज्ञान मंडपात उपस्थित आहे. खरोखर ही आनंदाची बाब असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले.

किर्तनास लाभतेय भाविकांची उपस्थिती
येथील प.पू. नथ्थुसिंग बाबा राजपूत जन्मशताब्दी वर्ष, वारकरी शिक्षण संस्था आळंदी शताब्दी वर्ष व वै. डिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव या त्रिवेणी योगानिमित्त हा कार्यक्रम संपन्न होत आहे. यामध्ये दररोज पारायण सोहळा व किर्तनाचा कार्यक्रम होत असून भाविकांची उपस्थिती लाभत आहे.

सहकार्य करण्याचा संकल्प
दरम्यान, रविवार 1 रोजी सकाळी 11 वाजता सतपंथरत्न महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांचे प्रवचन झाले. त्यांनीही आपल्या प्रवचनात असे भव्यदिव्य कार्यक्रम संपन्न होणे भावी पिढीसाठी गरजेचे असून या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळत असल्याने यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा संकल्प नूतन वर्षानिमित्त करावा, असे आवाहन केले. या श्री एकनाथी भागवत पारायणाला उपस्थिती लाभत असून सुमारे पाचशेच्या वर भाविकांची संख्या आहे.