मनी वसे ते स्वप्नी दिसे

0

उत्तर प्रदेशच्या ताज्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर मायावती यांना एकूणच मतदानाविषयी शंका निर्माण झाली. त्यांनी तसे उघड बोलून दाखवले. त्यांना आपण सत्तेत येऊ अशी अपेक्षा होती आणि तिचा पुरता बोजवारा उडाला. सत्तेची गोष्ट दूर राहिली. मायावतींच्या पक्षाला साधा विरोधी पक्ष होण्याइतक्याही जागा जिंकता आल्या नाहीत. त्याच्याही पुढली शोकांतिका म्हणजे मायावती राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि पुढल्या वर्षी निवृत्त होतील. तेव्हा पुन्हा तिथेही निवडून येण्याइतके संख्याबळ त्यांच्या वाट्याला आलेले नाही. साहजिकच त्यांचा राजकारण व निवडणुकीविषयी पुरता भ्रमनिरास झाला असल्यास नवल नाही. अर्थात त्यात एकट्या मायावतीच नाहीत. समाजवादी पक्षाचे पराभूत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापासून काँग्रेसचेही अनेक नेते समाविष्ट आहेत. म्हणूनच की काय, त्यापैकी अनेकांनी आगामी काळात मतदान यंत्राचा वापर थांबवण्याची मागणी केली आहे. आपले काय चुकले, त्याचा विचारही यापैकी कोणाला करावा असे वाटलेले नाही. भाजपला इतकी मते मिळालेलीच नाहीत, तर अन्य कुठल्याही पक्षाच्या दिलेले मत यंत्राने परस्पर फिरवून भाजपच्या खात्यात ढकलले असल्याची आशंका, यापैकी प्रत्येक नेत्याने व्यक्त केलेली आहे. त्यांना संपूर्णपणे गैरलागू म्हणता येणार नाही. आपल्या मनात असते, तेच खरे वा तसेच जग चालते, अशी अनेकांची पक्की समजूत असते. त्यानुसारच ह्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत. कारण राजकीय पक्ष असेच वागत असतील, तर यंत्रानेही तसेच वागावे, अशी या लोकांची अपेक्षा दिसते. म्हणजे असे की समजा, कुणालाच बहुमत मिळाले नसते तर मायावती कशा वागल्या असत्या?

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

1993 सालात उत्तर प्रदेशात भाजपचा दबदबा होता आणि त्याला हरवणे शक्य नसल्याने मुलायमसिंग यांनी पुढाकार घेऊन कांशिराम यांच्या बहुजन समाज पक्षाशी निवडणूकपूर्व युती केलेली होती. त्या दोघांना मिळून बहुमत मिळाले नाही तरी भाजपचेही बहुमत हुकलेले होते. साहजिकच भाजपसोडून सर्व पक्षांनी पुरोगामित्व टिकून राहण्यासाठी सपा-बसपा युतीला पाठिंबा दिला आणि नवे सरकार बनवले होते. तेव्हा त्यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेससहीत अन्य लहान पक्षांनीही मुलायमसिंग सरकारला पाठिंबा दिलेला होता. पण अवघ्या वर्षभरात सपा-बसपा यांच्यात बिनसले आणि बसपाच्या नेत्या मायावतींनी मुलायमचा पाठिंबा काढून घेतला. पुढे जाऊन भाजपच्या छाठिंब्याने मायावतीच मुख्यमंत्री होऊन गेल्या. तेव्हा त्यांनी भाजपचा पाठिंबा घ्यावा, असा कौल मतदाराने दिलेला नव्हता, की मायावतींना सत्तेवर बसवण्याचा कौल भाजपच्या मतदाराने दिलेला नव्हता. पण दोघांना मत देणार्‍याच्या इच्छा व अपेक्षा पायदळी तुडवून दोन्ही पक्षांनी साटेलोटे केले होते. मतदाराची मते भलतीकडे फिरवून दाखवलेली होती. प्रचार करताना किंवा मते मागताना पक्ष वा नेते ज्या कारणास्तव उभे ठाकलेले असतात, त्याला निकालानंतर हरताळ फासला जाण्याची ती पहिलीच वेळ नव्हती. त्याहीपूर्वी अनेकदा असे झालेले होते आणि मतदारालाच थक्क होण्याची पाळी राजकीय पक्षांनी अनेकदा आणलेली आहे. मग कालपरवा गोव्यात झालेली अजब आघाडी असो किंवा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुका असोत. मतदाराच्या कौलाचा विचका प्रत्येक राजकीय पक्षांनी करून दाखवला आहे. ज्यांना नाकारले त्यांनाच बदलण्यासाठी दिलेल्या मतांच्या बळावर पुन्हा तेच सत्ताधारी सत्तेत विराजमान झालेले आपण बघत असतो. ही किमया कुठल्या मतदान यंत्राने केलेली नाही. यंत्राने काय केले, असा सवाल मायावती वा अन्य राजकीय नेते विचारतात. तेव्हा त्यांना मतदान यंत्रेही माणसासारखी मतलबी वा दगाबाज असतात असे वाटते काय? यंत्राला मन नसते म्हणूनच कुठलाही स्वार्थ परमार्थ नसतो. त्याला लबाडी करता येत नाही. ते यंत्र वापरणारा नक्की गफलती करू शकतो. पण जे आदेश वा संकेत मिळालेले असतात, त्याच्या तसूभर पलीकडे कुठले यंत्र जात नाही. आपल्या फायदा तोट्याचा विचार यंत्र करू शकत नाही. त्याला भावनाच नसतात, रागलोभ नसतात. म्हणूनच यंत्र मिळालेल्या हुकमाचा ताबेदार असते. अशा निर्जीव यंत्राने प्रामाणिक असायला हवे आणि माणसे वा राजकीय पक्षांनी मात्र लबाडी करण्यास हरकत नाही, असे मायावतींना म्हणायचे आहे काय? मते एका कारणासाठी मागायची आणि नंतर त्याच मतांमुळे मिळालेले संख्याबळ अन्य कुठल्या भलत्या हेतूसाठी वापरायचे, असे यंत्र वागत नाही. पण राजकीय नेते व पक्ष बिनदिक्कत तसे दगाबाजी करीत असतात. मुलायमशी युती करून मिळवलेल्या जागा या बसपाला भाजपविरोधात मिळालेल्या होत्या. पण त्याच जागा मायावतींनी मुख्यमंत्रीपद पदरात पाडण्यासाठी बेधडक वापरल्या. तेव्हा भाजपविरोधी मते परस्पर भाजपकडे वळवली नव्हती का? गेल्या पाच वर्षांत आपल्यावरच्या खटल्यांना स्थगिती देण्यासाठी मायावतींनी लोकसभा राज्यसभेत विविध विषयांत काँग्रेसविरोधी भाषणे देत, त्याच काँग्रेस पक्षाला आपली मते बहाल केलेली नव्हती काय?

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज[edsanimate_end]

एफडीआयविरोधात बोलून पुन्हा त्यालाच मत देणार्‍या मायावतीही मते फिरवणारे यंत्र आहेत काय? बहुधा तसेच असावे. म्हणून त्यांना मतदान यंत्रेही तशीच वागत असल्याचा भास झाला असावा. अर्थात मायावतीच नाहीत, प्रत्येक नेता किंवा पक्ष आजकाल तितकाच बेछूट व बेताल वागतो आहे. साहजिकच त्यांना यंत्राने तटस्थपणे नोंदवलेली प्रामाणिक मते खोटी वाटली तर नवल नाही. गमतीची गोष्ट म्हणजे हे सर्व लोक स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. पुरोगामी म्हणजे जो येऊ घातलेल्या युगाचा स्वागतकर्ता असतो आणि कालबाह्य झालेल्या जुन्या गोष्टींचा त्याग करायला सतत तप्तर असतो. नरेंद्र मोदी हे फार शिकलेले नाहीत म्हणून हिणवले जाते. पोस्टल ग्रॅज्युएट म्हणून त्यांची हेटाळणी झाली आहे. पण हाच माणूस मागली दहाबारा वर्षे नव्या युगाला सातत्याने प्रतिसाद देतो आहे. एकविसावे शतक तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे असल्याचे मान्य करून, मानवी जीवन सुकर होण्यासाठी नवनव्या तंत्राचा उपयोग करण्याचा या ‘अपुरे शिक्षण असलेल्या’ पंतप्रधानाला ध्यास आहे. उलट्या बाजूला सुशिक्षित वा अतिशिक्षित केजरीवालसारखे नेते आहेत. इंजिनीअर असून, केजरीवाल मतदान यंत्रावर अविश्‍वास दाखवत आहेत. पुन्हा कागदी मतपत्रिकेचा आग्रह धरत आहेत. मग यातला पुरोगामी कोण म्हणावा? जो आगामी काळातील व भविष्यातील जग बघतो, तो पुरोगामी की मागासलेल्या जुन्या गोष्टींचा आग्रह धरतो तो प्रतिगामी? अर्थात मुद्दा नवेपणा वा यंत्राचा नाही. ज्यांना आपला पराभव पचवता येत नाही, त्यांचे हे दुखणे आहे. लोकांची मते घेऊन मिळवलेल्या जागा व बळ कुणाच्याही खात्यात परस्पर फिरवू, अशी मक्तेदारी ज्यांची आहे, त्यांना यंत्राने आपली मक्तेदारी हिसकावून घेतली अशी भीती भेडसावते आहे. वास्तवात असे काहीही झालेले नाही. केजरीवालना 2015च्या विधानसभेत अपूर्व मते मिळाली, तेव्हा यंत्राची शंका आलेली नव्हती.

मायावतींनाही 2007 च्या मोठ्या विजयात यंत्राची लबाडी दिसली नाही. मतदाराने यंत्राच्या मतदानातून तीच मक्तेदारी हिसकावून घेतल्यामुळे हे लोक विचलित झाले आहेत. पण गोवा मणिपूरपासून राज्यातल्या जिल्हा परिषदेपर्यंत प्रत्येकाने यंत्राच्या गफलतीलाही लाजवणार्‍या खेळी केल्या. त्याची मात्र कुणालाच शरम वाटलेली नाही.

Copy