मनपा सेवक पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

0
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने घोषणा
 पुणे विभागातून प्रथम क्रमांक : लोणावळ्यात वितरण सोहळा
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना देण्यात येणारा दीपस्तंभ पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील पतसंस्था संचालकांचे दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे झाले. त्यावेळी पुरस्कार वितरण झाले. या वेळी आमदार बाळा भेगडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपस्थित होते.
यांनी स्विकारला पुरस्कार
महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पुणे विभागातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजूर्डे, चेअरमन आबा गोरे, उपाध्यक्ष संजय कुटे, खजिनदार महाद्रंग वाघेरे, संचालक भगवान मोरे, महादेव बोत्रे, दिलीप गुंजाळ, राजू चिंचवडे, रमेश चोरघे, यशवंत देसाई, अंबर चिंचवडे, नंदू घुले, व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर यांनी स्विकारला.
मनपा पतसंस्था राज्यात रोल मॉडेल
झिंजूर्डे म्हणाले, या पतसंस्थेच्या वतीने सभासदांचे आर्थिक हित जोपासतच सामाजिक जबाबदारी म्हणून बळीराजाला मदत व्हावी या उद्देशाने या वर्षी राज्य सरकारकडून तुरडाळ विकत घेऊन सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात मोफत वाटण्याचा व केरळ येथील अतिवृष्टीत बाधित झालेल्या नागरिकांना मोफत तूरडाळ वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सातारा, जांब गावातील श्री मारुती देव व चिलाई देवी ट्रस्टच्या वतीने गावात बांधण्यात येणार्‍या बंधार्‍यास एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. सलग तीन वर्ष ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविणारी ही संस्था राज्यात रोल मॉडेल ठरेल.
9 कोटी 36 लाख नफा
प्रास्ताविक करताना चेअरमन आबा गोरे यांनी सांगितले की, मार्च 2018 अखेर संस्थेने 9.36 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. तर सभासदांच्या ठेवी 55.58 कोटी रुपयांच्या आहेत. मुदतकर्ज मर्यादा दहा लाख व अल्पमुदत कर्ज वीस हजाररुपये देणारी ही पतसंस्था स्वभांडवलावर कर्ज वितरण करीत आहे. थकीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे. सुत्रसंचालन संजय कुटे आणि आभार महाद्रंग वाघेरे यांनी मानले.
Copy