मनपाच्या पथकाला आत्महत्येची धमकी दोन भाजीपाला विक्रेत्यांना अटक

जळगाव- गणेश कॉलनीतील बजरंग बोगद्याजवळील भाजीपाला विक्रेत्यांनी महापालिकेच्या पथकावर बुधवारी दगडफेक करीत शिविगाळ, झटपट केली. तर यातील काही जणांनी आत्महत्येची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना गुरुवारी अटक केली. तर एक जण पसार झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
बजरंग बोगद्याजवळील रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांना मानराज पार्कजवळ जागा दिलेली आहे. परंतु, विक्रेते त्या नवीन नियोजित जागेवर भाजीपाला विक्री न करता ते रस्त्यावर दुकान थाटून भाजीपाला विकतात. त्या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक बुधवारी गेले. त्या वेळी संतप्त विक्रेत्यांनी पथकातील कर्मचार्‍यांवर दगडफेक करीत शिविगाळ केली. तर काही जणांनी कर्मचार्‍यांशी झटापट केली. अधिकारी, कर्मचार्‍यांना आत्महत्येची धमकी दिल्याप्रकरणी श्याम आनंदचंद भोई (खंडेरावनगर) व आकाश शिवाजी गावंडे (रामेश्‍वर कॉलनी) यांना अटक केली. तर सागर शिवाजी गावंडे (रामेश्‍वर कॉलनी) हा तरुण पसार झाला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील कारवाई झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.