मनपाच्या ढिसाळ नियोजनामुळे धुळ्यात पाण्याची कृत्रिम टंचाई

0

धुळे। धुळेकर नागरिकांना दीड-दोन वर्षे पाणी पुरवठा होऊ शकेल इतका जलसाठा शिल्लक आहे. परंतु, महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे पाणी पुरवठयाचा सुनियोजित आराखडा तयार करुन दिवसाआड मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. याबाबत मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना निवेदन देण्यात आले.

योजनांकडे दुर्लक्ष केल्याने बोजवारा
निवेदनात म्हटले आहे की, सुलवाडे बॅरेज, नकाणे तलाव व डेडरगाव तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. दररोज पाणी पुरवठा केला तरी पाणी पुरेल, अशी स्थिती आहे. परंतु, महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे धुळेकर नागरिकांना 10-12 दिवसांपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मोठया प्रमाणात पाणीपट्टी आकारुन त्यापोटी करोडो रुपयांची वसूली केली जाते. त्यामुळे दररोज किंवा दिवसाआड मुबलक पाणी मिळावे अशी नागरिकांची मागणी आहे. पाणीपुरवठा करायला हवा. परंतु, मनपा प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडला आहे. मनपा प्रशासनाने 136 कोटी रुपयांच्या योजनेकडेही अशाच पध्दतीने दुर्लक्ष केल्यामुळे बोजवारा उडत आहे. इतक्या मोठया प्रमाणात निधी आला असतांना अभ्यासपूर्ण नियोजन करुन ही योजना कार्यान्वित करणे अपेक्षीत होते.धुळेकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने सुनियोजित आराखडा तयार करुन किमान दिवसाआड मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा. त्यासाठी वीज कंपनीशी समन्वय साधून त्या-त्या भागात वीज असतांनाच पाणी पुरवठा करावा. अन्यथा विविध आंदोलने केली जातील, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी महानगरप्रमुख सतिष महाले, विरोधी पक्षनेता गंगाधर माळी, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, पंकज गोरे, ज्योत्स्ना पाटील, देविदास लोणारी, दिगंबर चौधरी उपस्थित होते.