मध्य प्रदेश: कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराच्या मुलीची आत्महत्या

0

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपची साथ धरल्यानंतर मध्य प्रदेशमधील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया पाठोपाठ कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी एकगठ्ठा राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. बंडखोर आमदारांपैकी एका आमदाराच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया समर्थक आमदार सुरेश धाकड यांची मुलगी ज्योती हिने आत्महत्या केली आहे. राजस्थानमधील सासुरवाडीला ज्योतीने गळफास घेतली.

धाकड यांचा राजीनामा मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी काल रात्रीच मंजूर केला आहे. मुलीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच धाकड हे राजस्थानला गेले आहेत. मध्यप्रदेश विधानसभेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विशेष सत्र बोलविण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे भवितव्य आता बंडखोर 16 आमदारांवर निर्भर आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांना अजुनही आपले सरकार वाचवता येऊ शकते.