मध्य प्रदेशात स्कूल व्हॅन-बसच्या अपघातात ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

0

भोपाल : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या बीरसिंहपूर गावाजवळ स्कूल व्हॅन आणि बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ शालेय विद्यार्थी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली आहे.

पोलीस अधिक्षक संतोषसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरसिंहपूर येथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८ ते ९ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सुमारे १०.३० च्या दरम्यान झाला. अपघातातील सर्व विद्यार्थी हे बीरसिंहपूर येथील लकी कॉन्वेंट स्कूलचे होते. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल जैन, पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली असून पीडितांच्या कुटुंबीयांना त्वरीत मदतीचे आदेशही दिले आहेत.

Copy