मध्य प्रदेशात भाजप प्रचारकांना मोफत पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपाला टाळे !

0

भोपाळ-सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच मध्य प्रदेशमध्ये तीन पेट्रोल पंपांना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी टाळे ठोकण्यात आले आहे. राज्यातील मतदान तासांवर येऊन ठेपलेले असतानाच सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान भोपाळ आणि बालाघाट येथील पेट्रोल पंपांवर भाजपा तसेच समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणाऱ्यांना मोफत पेट्रोल वाटप करण्यात येत होते.

निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिन्ही पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही पेट्रोल पंपाचे इंधनविक्रीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. पारदर्शक निवडणुकांसाठी तैनात करण्यात आलेल्या भरारी पथकांना भोपाळमधील एका पेट्रोलपंपावर भाजपाच्या उमेदावरांचा प्रचार करणाऱ्यांना मोफत पेट्रोल वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली.

पथकाने कारवाई करुन चौकशी केल्यानंतर या पेट्रोल पंपावर विक्री झालेल्या २४५ लीटर पेट्रोलसंदर्भात पंप मालकाकडे कोणताच हिशेब उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली. यानंतर पेट्रोलपंप व्यवस्थापक आणि मालकाविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा पेट्रोल पंप बंद करण्यात आला.

त्यानंतर भरारी पथकाने इतर पेट्रोलपंपाची पहाणी केल्यानंतर बालाघाट येथील दोन पेट्रोल पंपावर अशाच प्रकारे समाजवादी पक्षाच्या प्रचाराकांना दुचाकीसाठी मोफत पेट्रोल वाटप होत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर हे दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आले.

Copy