मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक : चौघांना अटक

रावेर : मध्यप्रदेशातून अवैध गुरांची वाहतूक करणार्‍या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तीन गुरांची सुटका करीत महिंद्रा पीकअप गाडीसह सुमारे पाच लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. मध्यप्रदेशातून शेरीनाकाकडून मोरावल ते रसलपुर गावाकडे येणारी महिंद्रा पीकअप (एम.पी. 10 जी. 3026) या वाहनातून तीन गोवंश जातीच्या गुरांची अवैध वाहतूक होताना पाल आऊट पोस्टचे पोलीस दीपक ठाकूर, संदीप धनगर, अतुल तडवी, नरेंद्र बाविस्कर यांना रात्री गस्तीदरम्यान आढळल्याने त्यांनी जप्त केले. या प्रकरणी दीपक ठाकुर यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश भिलाला, सुनील भिलाला, राहुल भिलाला (तिघे रा.पाडल्या, ता.झिरन्या, मध्यप्रदेश) व हसन शेख कय्यूम (रा.रसलपूर, ता.रावेर) यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली. पाच लाख रुपयांची पीकअप व्हॅन, 18 हजार किंमतीचे तीन गोवंश गुरे ताब्यात घेण्यात आले. तपास पोलीस हेड कॉस्टेबल राजेंद्र राठोड करीत आहेत.