मधुर भांडारकरांचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैनला शिक्षा

0

मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी मॉडेल प्रीती जैन हिला मुंबई सत्र न्यायालयाने 10 हजार रुपयांच्या दंडासह तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रीती जैन हिच्यासह अन्य दोघांना न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. तर, गवळी टोळीतील दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

प्रीती जैनने 2005 साली दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. याप्रकरणी प्रीती जैनला सप्टेंबर 2005 मध्ये अटकही झाली होती. त्याआधी तिने मधुर भांडारकर यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. चित्रपटात काम देण्याचे अमीष दाखवून भांडारकर यांनी माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप प्रीती जैन हिने केला होता. पुरावा म्हणून तिने भांडारकर यांनी पाठवलेले एसएमएसही दाखवले होते. मात्र, तिचे हे आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत.

दरम्यान, प्रीतीने मधुर भांडारकरांच्या हत्येसाठी अरुण गवळी टोळीच्या माणसांना सुपारी दिल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीच्या रकमेपैकी 70 हजार रुपये प्रीती हिने गवळीच्या एका माणसाला दिले होते. काम न झाल्याने पैसे परत मिळण्यासाठी तिने त्या माणसाकडे तगादा लावला होता. गवळी टोळीने ही माहिती हस्तकांमार्फत पोलिसांकडे पोहोचवली आणि हे अचानकच हे प्रकरण सर्वांसमोर आले. आठवडाभराच्या तपासानंतर पोलिसांनी 10 सप्टेंबर 2005 रोजी प्रीतीविरुद्ध याप्रकरणी खटला दाखल केला होता.