‘मधुकर’च्या कामगारांचा 17 महिन्यांपासून पगार थकला

0

फैजपूर । येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या गलथान कारभारामुळे अहोरात्र काम करणार्‍या कायम कामगारांचा ऑक्टोबर 2015 पासून ते आजपर्यंत नियमित हंगामी कायम कर्मचार्‍यांचाही नोेव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 पर्यंत पगार देणे बाकी आहे. या थकलेल्या पगारासोबत 4.67 टक्के बोनस व 13 दिवसांची बक्षिसी तसेच हंगामी कामगारांचे 2015 चे रिटेन्शन देणे बाकी असतांना महिन्यातून कमीत कमी दोन संचालक मंडळांच्या सभांचे मिटींग भत्ते मात्र नियमित देण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहेे.

जाहिरातबाजीवर पैशांची उधळपट्टी
कामगार पगार, बोनस, बक्षिसी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या लाखो रुपये, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे देणी, सभासद शेअरी साखर यासह लाखो रुपयांचे कर्ज या सर्व बाबी कारखान्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतांना कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या व्यक्तीगत जाहिरातबाजीवर हजारो रुपयांची उधळपट्टी होेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कामगार संघटनेवर प्रश्‍नचिन्ह
प्रत्येक वेळेला दोन तीन वेळेस पगार टाकून कर्मचार्‍यांच्या व कामगार युनियन पदाधिकार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जातात. असे असतांना देखील चेअरमन यांच्यासाठी कामगार युनियन संघटना ही जाहिरात देण्यासाठी मागे राहिली नाही, हे आश्‍चर्य आहेे. त्यामुळे कामगार युनियन संघटनेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. कारखाना हितासाठी येथील सर्व कामगार संयम पाळत असून भविष्यात त्याचा स्फोट होण्यास उशिर लागणार नाही.