मद्यविक्री बंद झाल्याने हॉटेल व्यवसाय संकटात!

0

पिंपरी-चिंचवड : सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवरील वाढते अपघात, या विषयासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 500 मीटर अंतराच्या आत असलेली सर्व मद्य विक्रीची दुकाने, परमिटरूम, बिअरबार, लॉज व पब बंद करण्याचे आदेश दिल्याने मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांचे शटर डाऊन झाले आहेत. 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात मात्र, ही मर्यादा 500 मीटरऐवजी 220 मीटर अंतराची आहे. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या भागात असलेल्या राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावरील 220 मीटर अंतराच्या आतील मद्यविक्रीच्या आस्थापनांनादेखील टाळे लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 1 एप्रिलपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार 500 व 220 मीटर अंतराच्या भागात असलेली मद्यविक्रीची दुकाने बंद झाली खरी; परंतु मद्यविक्री बंद झालेली दिसून येत नाही. चोरी-छुप्या पद्धतीने मद्यविक्री सुरूच असून, अशा रितीने मद्यविक्री करणार्‍यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. 21 लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातून तीन प्रमुख महामार्ग जातात. या महामार्गांवर असलेल्या हॉटेल्स, बिअर बार, परमिटरूमदेखील न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. काही व्यावसायिकांना तर आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. मद्यविक्री बंद झाल्याने राज्य शासनाचादेखील कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत फेरविचार झाला पाहिजे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.

न्यायालयाकडून आदेशात बदल
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 500 मीटरच्या परिसरात मद्यविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपूर्वी बदल करून 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात 220 मीटरपर्यंतच मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. तर, 20 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात 500 मीटरमध्ये मद्य विकता येणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 21 लाखांच्या पुढे असल्याने शहराच्या हद्दीतून जाणार्‍या तिन्ही महामार्गांलगतच्या 500 मीटर अंतरावरील हॉटेल्सना मद्यविक्री थांबवावी लागली आहे.

अपघात नियंत्रणासाठी पाऊल
अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गालगत 500 मीटरच्या आतील मद्याची दुकाने, परमिटरूम, बिअरबार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2016 मध्ये दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2017 पासून सुरू झाली आहे. या निर्णयामुळे मद्य विकणार्‍या व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरल्याने तसेच, राज्य शासनानेदेखील केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात त्यानंतर बदल केला. 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात 220 मीटरपर्यंतच्या अंतरावरच मद्यविक्रीवर बंदी असेल, असे सुधारित आदेशात म्हटले आहे. 20 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात 500 मीटरमध्ये मद्य विकता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो हॉटेल्स बंद
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 21 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लोकसंख्या अधिक असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जाणार्‍या तीन महामार्गांलगतच्या हॉटेलवरही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी आली आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. तसेच नाशिक-पुणे महामार्ग आणि पुणे-बंगळुरू हे दोन प्रमुख महामार्गही याच हद्दीतून जातात. निगडी ते दापोडी या जुना मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे 300 हॉटेल्स आहेत. कासारवाडी येथून जाणार्‍या नाशिक महामार्गाला लागून असलेल्या कासारवाडी, भोसरी परिसरात शंभराहून अधिक हॉटेल्स आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू हा मार्ग शहराच्या बाहेरील बाजूने जातो. या मार्गावर वाकड, ताथवडे, रावेत, किवळे येथील अनेक हॉटेल येतात. त्याचबरोबर 500 मीटरच्या हद्दीत थेरगाव, काळेवाडीतील काही हॉटेल येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ही हॉटेल बंद करावी लागली आहेत. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. 500 मीटर अंतरावर येणारी सुमारे 900 हॉटेल्स शहरात असून या हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महामार्गांच्या 500 मीटर अंतरातील अनेक हॉटेल्स बंद झाली आहे. त्यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी स्थलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे. तर इतरांनी हॉटेलमधील मद्यविक्री बंद करण्याविषयी विचार केला आहे. परंतु स्थलांतर तसेच मद्यविक्री थांबवूनदेखील हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी सुटणार नाहीत. वर्षानुवर्षे ज्या जागेवर व्यवसाय करत होते; ती जागा सोडून अन्य ठिकाणी पुन्हा व्यवसाय सुरू करणे, म्हणजे नव्याने व्यवसाय सुरू करण्यासारखे आहे. त्यामुळे ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे व्यवसायात गुंतवलेले भांडवल निघणार नाही. परिणामी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे हॉटेलमधील मद्यविक्री बंद ठेऊन हॉटेल चालवण्याचा निर्णय घेतला तर त्यातून फारसा मोबदला (उत्पन्न) निघणार नाही. मद्यविक्री बंद झाल्याने ग्राहक फारसे फिरकणार नाही, असेही हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

द्रुतगतीवरील व्यावसायिकांना दिलासा
राष्ट्रीय व राज्य महामार्गावर 500 मीटरच्या परिसरात मद्यविक्रीवर बंदी घालण्याच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने बदल केल्याने ग्रामीण भागात व्यवसाय करणार्‍या शेकडो हॉटेल व ढाबे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महामार्गावरील मद्यविक्री बंदीच्या आदेशात बदल करताना सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात हे अंतर 220 मीटर केले आहे. मावळ तालुक्यात लोणावळा ते देहूरोडदरम्यानच्या अनेक व्यावसायिकांना या सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे. परंतु लोणावळा, वडगाव, तळेगाव व देहूरोड या चार शहरांची लोकसंख्या 20 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेथे 500 मीटर अंतराची मर्यादा कायम असणार आहे.

ग्रामीण भागात तळीरामांची गर्दी
मावळ तालुक्यातील उर्वरित ग्रामीण भागात अनेक गावांची लोकसंख्या 20 हजारांपेक्षा कमी असल्याने शहरी भाग वगळता उर्वरित परिसरात महामार्गापासून केवळ 220 मीटर अंतरावर मद्यविक्री करता येणार आहे. लोणावळा-खंडाळा तसेच देहूरोडदरम्यान रस्त्यांच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात हॉटेल व ढाबे आहेत. त्यापैकी काही जणांकडे अधिकृत परमिटचे लायसन्स आहेत, तर अनेक जण स्थानिक प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने मद्यविक्री करतात. या सर्वांनाच सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता तळीरामांची गर्दी वाढणार, हे मात्र नक्की.

शहरी भागात चौकशीची गरज
शहरी भागातील मद्यविक्रीची दुकाने व हॉटेल व्यावसायिकांना मात्र, आपला व्यवसाय राष्ट्रीय व राज्य महामागार्पासून 500 मीटर दूर अथवा ग्रामीण भागात हलवावा लागणार आहे. शहरी भागात शहराची लोकसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त असली तरीदेखील एका ठराविक भागाची लोकसंख्या 20 हजार एवढी नसल्याने या आदेशातून पळवाटा काढत शहरी भागातदेखील 220 मीटर अंतरावर मद्यविक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा दुकानांची चौकशी करण्याची गरज आहे.

राज्यात 10 लाख लोक बेरोजगार!
महामार्गालगतच्या बार आणि मद्यविक्री करणार्‍या हॉटेल्स बंद करण्याच्या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे 35000 हॉटेल्सला बसला आहे, असा अंदाज आहे. हॉटेल्स अँड रेस्टारंटस ऑफ वेस्टर्न इंडियाने तब्बल 10 लाख लोकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळल्याची भीती व्यक्त केली आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या बार आणि मद्यविक्रेत्या दुकानांवर बंदी घालण्यात आल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. हॉटेल क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना आता दुसर्‍या कामाची शोधाशोध करावी लागणार आहे.