मतदान उत्तरप्रदेशात, पण निवड मात्र पुढल्या राष्ट्रपतीची  

0

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या विधानसभेसाठी मतदानाच्या पाच फ़ेर्‍या पुर्ण
झाल्या असून, आता शंभराहून कमी जागांसाठी मतदान व्हायचे बाकी आहे.
पुर्वेकडील या मतदानात भाजपाचे पारडे जड मानले जाते. म्हणूनच समाजवादी व
मायावती यांच्यासह भाजपाने तिथेच जोर लावला आहे. कारण मागल्या तीनचार
निवडणूकात तिथेच अधिक जागा मिळवणार्‍या पक्षाने राज्याची सत्ता काबीज
केलेली आहे. पण यावेळी राज्याच्या सत्तेपेक्षा भावी राष्ट्रपतीचे भवितव्य
या राज्याच्या निकालावर अवलंबून आहे.

लोकसभेत भाजपाने एकूण ४०३ विधानसभा मतदारसंघापैकी ३३४ जागी मताधिक्य
प्रस्थापित केले होते. त्यात थोडीफ़ार घट झाली, तरी भाजपा बहूमताचे गणित
साध्य करणार, हे प्रत्येक पक्ष ओळखून आहे. म्हणूनच समाजवादी पक्षाने
कॉग्रेसशी तडजोड केली आहे, तर मायावती सर्वस्व पणाला लावून झुंज देत
आहेत. त्याचे कारण त्यांना बहूमतापेक्षा अधिक यश भाजपाला मिळू द्यायचे
नाही. भाजपा लोकसभेइतके यश मिळवून गेला, तर बाकी दोन्ही पक्षांचे
राष्ट्रीय राजकारणातले महत्व संपुन जाणार आहे आणि त्याची साक्ष तीन
महिन्यात राष्ट्रपती निवडणूकीत मिळणार आहे. कारण उत्तरप्रदेश मोठ्या
मताधिक्याने काबीज केला तर पंतप्रधान मोदींना हवा तसा राष्ट्रपती निवडून
आणणे शक्य होणार आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडीत संसदेचे सदस्य व विधानसभांचे आमदार यांच्यात
समान मते विभागली जातात. त्यापैकी संसदेमध्ये भाजपाचे मताधिक्य आहेच. पण
देशभर पसरलेल्या विधानसभांच्या मतांमध्ये भाजपाचे अजूनही मताधिक्य नाही.
सहाजिकच उत्तरप्रदेशात जितके अधिक आमदार भाजपाला मिळतील, तितकी
राष्ट्रपतींची निवड भाजपासाठी सोपी होणार आहे. म्हणूनच अखिलेश व मायावती
आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजत आहेत, तर मोदी-शहा राष्ट्रपतीसाठी
अधिकाधिक मते जमवण्याची लढाई उत्तरप्रदेशात लढत आहेत.