मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी दिवस कामे ‘शेल्फ’वर ठेवा

रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचे निर्देश

नंदुरबार। जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान पाच कामे शेल्फवर ठेवतानाच किमान 500 मनुष्य दिवस कामांचे नियोजन करीत ते सुध्दा ‘शेल्फ’वर ठेवावेत, असे निर्देश राज्याचे रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात रोहयो आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, रोहयोचे राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, मंत्रालयातील रोहयोचे अधीक्षक अभियंता राजेंद्र शहाडे, ठाणे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुनील काळे, रोहयोचे राज्य प्रकल्प अधिकारी (एनआरएम) सायली घाणे, राज्य समन्वयक सामाजिक अंकेक्षण ज्ञानेश्वर सपाटे, विकास दांगट, नारायण देसले आदी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सीपीएफअंतर्गत नियुक्त केलेले मनुष्यबळ, ग्रामपंचायत व निर्मित मनुष्यदिवस, निवड केलेल्या ग्रामपंचायतीवर झालेला खर्च, 2021-22 मध्ये घेण्यात आलेली कामे, 2021-22 लेबर बजेट अंमलबजावणी व साध्य, कुशल, अकुशल खर्च, यंत्रणानिहाय सुरु असलेल्या कामांचा तपशिल, शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायती आदींचा सविस्तर आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे (रोहयो) यांनी सादरीकरणाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती दिली. सीपीएफ योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या माहितीचे सादरीकरण जिल्हा समन्वयक निखिल थोरात यांनी केले.

गावातच रोजगार उपलब्ध होणार

नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावयाची आहे. त्याचा या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्यावर गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. कुपोषित बालके आढळून आल्यास त्यांच्या पालकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा. याबरोबरच शेती व शेतीशी निगडित कामे घेण्यास प्राधान्य द्यावे, अशाही सूचना अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या.