मंदिरात चोरी करुन अल्पवयीन चोरट्यांनी मुद्देमाल लपविला होता कचर्‍यात

3

जळगाव– शिवाजीनगर परिसरातील श्री महावीर दिगंबर जिन चैत्यालय ट्रस्टच्या शांतीनाथ डिगंबर जैन मंदिरात सलग दोन दिवस चोरी करुन 300 तांब्याचे कलश तसेच एक पितळी समईसह काही तांब्याच्या वस्तू लांबविल्याचा प्रकार समोर आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच शहर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला असून रेकार्डवरील तीन अल्पवयीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एका अल्पवयीन मुलाला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून दोन अल्पवयीन फरार आहेत. दरम्यान सलग दोन दिवस मंदिरात चोरी केल्यावर मुलांनी मुद्देमाल हा गेंदालाल मिल परिसरातील एका कचर्‍यात ठिकाणी लपविला असल्याची माहिती समोर आली आहे.

काय घडली होती घटना
शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिराचा गाभा बंद आहे. प्रमोद हिरालाल जैन वय 55 रा. शिवाजीनगर हे मंदिराचे पुजारी आहे. तेच फक्त पूजाविधीसाठी मंदिर उघडत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पुजारी जैन यांनी पूजाविधीसाठी मंदिर उघडले असता त्यांना मंदिराच्या गाभा असलेल्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर गुरुवारी पुजारी जैन यांनी सकाळी 5.30 वाजता मंदिर उघडले असता मंदिराच्या सभागृह असलेल्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला होता. त्यानुसार याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.

कचर्‍यात लपविला होता मुद्देमाल
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी गुन्हे शोध पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सुचना केल्या होत्या. गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे यांना मंदिरात चोरी करणारे अल्पवयीन चोरटे गेंदालाल मिल मधील असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शिरसाळे यांनी सहाययक फौजदार वासुदेव सोनवणे, प्रनेश ठाकूर, विजय निकुंभ यांच्यासह गेंदालाल मिल मधील अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबूली देत मुद्देमालदोन साथीदारांसोबत प्रकार केल्याची कबूली दिली. गेंदालाल मिल परिसरातील एका ठिकाणी कचर्‍यात अल्पवयीन चोरीचा मुद्देमाल लपविला होता. तो काढून दिला असून पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान त्याचे दोन अल्पवयीन साथीदार फरार असून त्यांचाही शोध सुरु आहे. दरम्यान निष्पन्न झालेले तिघेही अल्पवयीन चोरट्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते रेकार्डवरील असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास विजय निकुंभ करीत आहेत.

Copy