मंत्र्याच्या गावात आरोग्यसेवेचा बोजवारा

0

दोंडाईचा (प्रदिप जाधव)। राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या गावातील प्रशस्त व विविध सोयींनी युक्त अशा उपजिल्हा रूग्णालयात मंजूर 46 पदांपैकी 13 पदे रिक्त आहेत. त्यात कायमस्वरूपी मुख्य वैद्यकीय अधिकार्‍याचे पद रिक्त असल्याने येथे दाखल होणार्‍या रूग्णांवर होणार्‍या शस्त्रक्रीया व विविध उपचार प्रलंबित राहत आहेत. हे उपजिल्हा रूग्णालय 50 खांटाचे आहे. या उपजिल्हा रूग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व नाशिकच्या आरोग्य संचालकाकडे मागणी करूनही अद्याप वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक झालेली नाही. नागरिकांच्या मागणीकडे दुर्लष केले जात असल्याची ओरड परिसरातून होत आहे. यात सात वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे मंजूर असतांना प्रत्यक्ष तीन पदे रिक्त आहेत. तसेच मुख्य वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता,सहायक अधिसेविका,सहायक परिसेविका हि पदे रिक्त आहेत. आरोग्य संचालक एल. आर. घोडके यांनी 22 फेबू्रवारीला दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयाला भेट दिली होती. तेव्हा इतर सुविधा व रिक्त पदे भरणार असे आश्‍वासन दिले होते. त्यानूसार केवळ एकच पद भरण्यात आले. पंरतु आजही दहा पदे रिक्त आहेत.

तज्ज्ञ डॉक्टर नाहीत
या रूग्णालयात स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ,अस्थिरोग तज्ञ, दंतचिकित्सक नसल्यामुळे महिला व बालकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याच्या अडचणी येत आहेत. परिणामी महिलांना तपासणीसाठी धुळे शहरात जाण्याचा सल्ला दिला जातो. वाढते तापमान लक्षात घेऊन प्रभारी वैद्यकीय अधिक्षकांनी उष्माघात कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षात पुरेशी सोयदेखील केली आहे. रूग्णालयात रूग्णांसाठी बरीच यंत्रसामग्री आहेत पंरतु पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने आहेत त्या डॉक्टरांनादेखील रूग्णांवर उपचार करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रूग्णांकडे दुर्लष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

चारच वैद्यकीय अधिकार्‍यांवर भिस्त
याठिकाणी डॉ.ललित चंद्रे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक म्हणून काम पाहत आहेत. रूग्णालय स्थापनेपासूनच कायम वैद्यकीय अधिक्षकाची नेमणूक झालेली नाही. वर्ग दोनच्या सात वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी फक्त चारच अधिकारी कार्यरत आहेत. त्यात डॉ.ललित चंद्रे,डॉ.सचिन पारख,डॉ.जयेश ठाकूर, आणि नूकतेच रूजू झालेले डॉ.अनिल भामरे असे चार वैद्यकीय अधिकार्‍यांवर संपूर्ण उपजिल्हा रूग्णालयाची मदार येवून ठेपली आहे.